मंत्रीमंडळ विस्तारात विदर्भाला प्राधान्य मिळणार

vidhan
मुंबई- पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या होत असलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात विदर्भातले चार ते पाच नवे चेहरे दिसतील असे खात्रीलायक वृत्त आहे. पुण्याचे ज्येष्ठ आमदार गिरीष बापट व खानदेशचे आमदार गिरीष महाजन या दोन गिरीषांवरही मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत दिले जात आहेत. कॉग्रेंसमधून भाजपत आलेले अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांचाही समावेश मंत्रीमंडळात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

येत्या २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी निदान डझनभर नवे मंत्री समाविष्ट केले जातील असे सूत्रांकडून समजते. नागपूरचे कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुले, पश्चिम विदर्भातील गोवर्धन शर्मा व चैनसुख संचेती यांचा समावेश मंत्रीमंडळात असेलच पण सांगली आणि नाशिकलाही मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. अमरावतीचे डॉ. देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असताना जलसंपदा आणि अर्थ राज्यमंत्रीपदाचा भार सांभाळला होता. त्यांच्या या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी त्यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळेल असे समजते.

मुंबई विभागातील आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा आणि माजी अध्यक्ष राजपुरोहित या तिघांपैकी एकाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असे संकेत दिले जात आहेत. यापूर्वीच मंत्रीमंडळात मुंबईतील ३ आमदारांना समावून घेण्यात आले असल्याने नवीन विस्तारात आता ए्यच मंत्रिपद मुंबईसाठी दिले जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment