बालगुलामी विरोधात सत्यार्थींचे लंडन मध्ये अभियान

satyarthi
लंडन – बालगुलामी आणि मुलांचा व्यापार या विरोधात कार्यरत असलेल्या नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी लंडनमध्ये बाल गुलामी विरोधात नवीन अभियानाची सुरवात केली आहे. बचपन बचाओ आंदोलनाचे प्रणेते सत्यार्थी यांनी ट्रस्ट महिला परिषदेत सहभागी होताना हे अभियान छेडले आहे. लंडन मधील महिला हक्क या विषयावर थॉमसन रॉयटर यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना सत्यार्थी म्हणाले मुलांची पळवापळवी, अपहरण करून त्यांचा व्यापार करणारे लोक हे माफियाच समजले पाहिजेत. बाल गुलामीचा शेवट व्हायला हवा. बालगुलामी आणि मुलांचा व्यापार हे जगातील सर्वात मोठे स्कँडल आहे. कारण या व्यवसायातील लोकांकडे प्रचंड पैसा असतो आणि त्यामुळे कायदा ते विकतच घेतात. अशावेळी आपण बालगुलामांची सुटका करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तो सफल होऊ शकत नाही. बरेच वेळा असे प्रयत्न धोकादायकही ठरतात. यासाठी सरकार, उद्योजक आणि कँपेनर्स यांनी एकत्र येऊन कायद्याला बळकटी दिली पाहिजे आणि मानवी व्यापार बंद पाडला पाहिजे.

गुलामीतून जेव्हा एखाद्या मुलाची मी सुटका करतो तेव्हा माझ्यात मी गुलामीवर विजय मिळविला अशी भावना असते. हा अनुभव अतिशय हळुवार, संस्मरणीय आणि स्वर्गीय आनंद देणारा असतो. गुलामीतून लहानग्याची सुटका म्हणजे देवाजवळ पोहोचण्याचा प्रकार आहे. या क्षेत्रात खूप काम करणे अद्यापी बाकी असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच हक्क आणि कायदे बदलले गेले पाहिजेत. लहान मुलांना पळविले जाते, अपहरण केले जाते आणि अक्षरशः जनावरांपैक्षाही कमी किमतीत विकले जाते याची अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment