आता मानवाच्या शरीरात येणार कृत्रिम रक्त!

blood
लंडन – आगामी दोन वर्षात मानवावर मानवी स्कंद पेशींपासून तयार केलेल्या कृत्रिम रक्ताची चाचणी घेण्यात येणार असून अनेक शास्त्रज्ञ यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पात कार्य करीत आहेत. २०१६ पर्यंत स्कंद पेशींपासून रक्त तयार करण्याची प्रक्रिया औद्योगिक पातळीवर सुरू करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. हे कृत्रिम रक्त, रक्तदान केलेल्या रक्ताची जागा घेऊ शकेल.

आम्ही प्रथमच मानवी शरीरात स्वीकारल्या जातील अशा लाल रक्तपेशी तयार केल्या आहेत. यापूर्वी तसे करता आले नव्हते. ५० लाख पौंडांच्या या प्रकल्पाचे नेतृत्व एडिनबर्ग विद्यापीठ करीत आहे. पहिल्यांदा थॅलेसिमिया असलेल्या रुग्णांना हे कृत्रिम रक्त दिले जाईल. त्यांना पाच मिलि. एवढ्या प्रमाणात रक्त देऊन पेशींचे वर्तन कसे राहते, याचा अभ्यास केला जाणार आहे. या चाचणीचा अर्थ लोकांनी रक्तदान करणे थांबवावे, असा मुळीच नाही. कारण कृत्रिम रक्त सुरळीतपणे वापरले जाण्यास अजून २० ते २५ वर्षांचा अवधी आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. प्लुरिपोटेंट म्हणजे बहुअवयव निर्मितीक्षम स्कंद पेशींपासून लाल रक्तपेशी मिळवताना प्रौढ त्वचा किंवा रक्तपेशी यांना जनुकीय तंत्राने स्कंद पेशींसारख्या स्वरूपात बदलावे लागेल असे स्कॉटिश नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन सर्व्हिस या संस्थेचे वैद्यकीय संचालक मार्क टर्नर यांनी सांगितले.

Leave a Comment