लोकशाही हाच फिजी आणि भारताला जोडणारा समान धागा- मोदी

fiji
फिजी आणि भारत या दोन देशांना जोडणारा लोकशाही हा समान धागा असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी फिजीच्या संसदेत बोलताना सांगितले. फिजीतील यशस्वी निवडणुकांबद्दल त्यांनी देशवासियांचे अभिनंदनही केले. दोन्ही देशातील नागरिकांना परस्परांच्या देशात येणे जाणे सुलभ व्हावे यासाठी भारतात फिजी नागरिकांना व्हीसा ऑन अराव्हलची घोषणा करतानाच मोदींनी फिजीला विविध क्षेत्रात विकासासाठी भारत ८ कोटी डॉलर्सची मदत देणार असल्योची घोषणाही केली.

फिजीतील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी दुप्पट विद्यावेतन देणार येईल असे सांगून मोदी म्हणाले की फिजीबद्दल भारतीयांच्या मनात विशेष स्थान आहे. भारत वीज आणि लघु उद्योगांसाठी ७ कोटी, ग्रामीण विकासासाठी ५० लाख, साखर उद्योग विकासासाठी ५० लाख डॉलर्सची मदत देईल असे जाहीर करतानाच फिजी भारताच्या पुढेच असल्याचेही मोदी म्हणाले.

दोन्ही देशातील समान धागे उलगडून दाखविताना मोदींनी भारत आणि फिजी येथे लोकसभा सभापतीपदी महिलाच असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र फिजीत दर ७ सदस्यांमध्ये १ महिला सदस्य आहे तर भारतात हेच प्रमाण ९ सदस्यांमध्ये १ महिला असे असल्याने फिजी भारतापेक्षा पुढेच असल्याचेही नमूद केले. पवन आणि उर्जा क्षेत्रात फिजीसह काम करण्यास भारताची तयारी असल्याचे सांगतानाच फिजीलाही डिजिटल फिजी बनवा असे आवाहन त्यांनी केले.

तेहत्तीस वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांनी फिजीला भेट दिली असून यापूर्वी १९८१ साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फिजीला भेट दिली होती.

Leave a Comment