महिंद्र स्कॉर्पिओ, झायलोच्या २३०० गाड्या परत बोलावणार

scorpi
वाहन उद्योगातील अग्रणी कंपनी महिंद्र अॅन्ड महिद्रने त्यांच्या लोकप्रिय स्कॉर्पिओ,एकसयूव्ही ५००, झायलोच्या २३०० गाड्या ग्राहकांकडून परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मे मध्ये उत्पादित झालेल्या या गाड्यांच्या इंजिनातील व्हॅक्युम पंप सदोष असल्याचे आढळल्यावरून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेला असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी या संदर्भात कंपनीशी वैयक्तीक संपर्क साधला आहे त्यांना ही दुरूस्ती मोफत करून दिली जाणार असल्याचेही समजते.

जुलै महिन्यातही महिद्राने स्कॉर्पिओ एक्सयूव्ही मॉडेलची २३ हजार वाहने परत बोलावली होती. या गाड्यांच्या व्हॉल्व प्रेशर नियंत्रण यंत्रणेत दोष आढळला होता. जुलै २०१२ मध्ये सोसायटी ऑफ इंडियन ऑटो मॅन्युफॅक्चरींग ने सुरक्षा संबंधी कारणे असतील तर कंपन्या ऐच्छिक रिकॉल करू शकतील असा नियम केल्यापासून विविध कंपन्यांनी सुमारे ७ लाख वाहने रिकॉल केली आहेत. त्यात मारूती, महिंद्र, टोयाटो, फोर्ड, होंडा आणि जनरल मोटर्स या कंपन्यांचा समावेश आहे.

गेल्याच महिन्यात होंडाने त्यांच्या ब्रायो हचबॅक, अमेझ, सीआर व्ही मॉडेलच्या २३३८ गाड्या रिकॉल केल्या होत्या. त्यात एअरबॅग सदोष असल्याचे कारण दिले गेले होते. निस्साननेही याच कारणास्तव मायक्रा आणि सनी मॉडेल्सच्या ९ हजार कार रिकॉल केल्या होत्या.