पंतप्रधानांच्या नावाने बनले बनावट प्रमाणपत्र

pramanpatr
औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक उत्पन्न २५ हजार रूपये असल्याचे प्रमाणपत्र भोकरदन तहसील कार्यालयाने सहीशिक्क्यासह जारी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सिद्धार्थ पैठणे आणि विजय कड अशी त्यांची नांवे आहेत.

या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार भोकरदन तहसील कार्यालयात ३० सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अर्ज केला गेला आणि दुसरेच दिवशी वार्षिक उत्पन्न २५ हजार रूपये असल्याचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून दिले गेले. त्यावर तहसीलदार म्हणून रामभाऊ शेळके यांची सही पण आहे. तहसील कार्यालयात पैसे देऊन अशी बनावट प्रमाणपत्रे दिली जातात हे दाखवून देण्यासाठी आणि तहसील कार्यालयाचा बेजबाबदारपणा उघड करण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे तहसीलदार शेळके यांनी पैठणे व कड यांनी हे प्रमाणपत्र बनावटरित्या तयार केले असून त्यावरील सही त्यांची नसल्याची तक्रार पोलिसांत नोदंविली आहे.

शेळके यांच्या म्हणण्याप्रमाणे या दोघांनी हे प्रमाणपत्र दाखवून शेळके यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. मोदींच्या नावाचे हे बनावट प्रमाणपत्र सोशल नेटवर्क साईटवर तसेच व्हॉटसअॅपवर धूम मचावते आहे असेही समजते.

Leave a Comment