मुंबई – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या २ महिन्यात राज्यातील १० कोटी रुपयांच्या आतील खर्चाचे लहान टोल नाकेबंद करण्यात येणार असून, २०० कोटीपर्यंतचे टोल स्वतः सार्वजनिक विभागामार्फत बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली.
दोन महिन्यात लहान टोल बंद करणार – चंद्रकांत पाटील
पाटील यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर या विषयावर तातडीने अंमलबजावणी करण्याचा निश्च य बांधकाम मंत्र्यांनी केला आहे. टोलवरून राज्यातील जनतेत मोठा रोष होता. टोलमधून मुक्तता मिळावी, अशी मागणी जनतेकडून सातत्याने केली जात आहे. जनतेची भावना लक्षात घेऊन, सरकारने राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राज्यातील सर्व टोलचा आढावा घेऊन, येत्या २० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बांधकाम मंत्री पाटील यांनी सांगितले. राज्याला १२१ टोल मधून, सध्या २६ हजार कोटी महसूल मिळत आहे. तरी सुद्धा जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत असून, त्यासाठी नवीन धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले.