सेनेबरोबर चर्चेसाठी अजूनही दारे उघडी- फडणवीस

fadan
नागपूर – राज्याचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरात सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला जुना मित्र पक्ष शिवसेनेसाठी चर्चेची दारे अजूनही उघडीच असल्याचे सांगतानाच सेनेबरोबर साटेलोटे होण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात करण्यात येणार असल्याचेही सांगितले. ३१ आक्टोबरला केवळ ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता.

सेनेच्या मागण्या भाजपने धुडकावून लावल्यानंतर राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे फडणवीस सरकार तरल्याचा तसेच सेना भाजप समझोत्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत मध्यस्ती करत असल्याचा आरोप फेटाळून लावताना फडणवीस यांनी राजकारणात चर्चेची दारे कधीच बंद होत नसतात असे सांगताना सेनेशी चर्चा होऊ शकते असे संकेत दिले.

दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी मुंबई भेटीवर येणार होते तेव्हा सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी करणार होते असे सांगितले जात होते. मात्र भागवत यांचा हा दौरा अचानक रद्द झाल्याने भागवत यांनी फोनवरून रविवारीच ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असल्याचेही सांगितले जात आहे. राष्ट्रवादी ऐवजी सेनेशी सलोखा करणे हे सर्वच दृष्टींनी भाजपसाठी अनुकुल राहिल असे संघनेत्यांचे मत असल्याचेही भाजप वरीष्ठ नेते सांगत आहेत. दरम्यान सोमवारी म्हणजे आज शिवाजी पार्कवर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment