देशाच्या इतिहासात प्रथमच छत्तीसगढ आणि झारखंड येथील दाट जंगलात नक्षल्यांबरोबर लढण्यासाठी महिला कमांडो पथके तैनात करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे अतिसंवेदनशील आणि धोक्याच्या भागात महिला सैनिक तैनात करणार्या मोजक्या देशांच्या यादीत भारत सामील झाला आहे.
नक्षलग्रस्त भागात प्रथमच महिला कमांडो पथके तैनात
या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार पंधरा दिवसांपूर्वीच छत्तीसगढच्या बस्तर भागात तर झारखंडमध्ये अज्ञात ठिकाणी केंद्रीय राखीव पोलिस दलातील महिला कमांडोच्या दोन तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत. या भागात नक्षल्यांबरोबर सुरक्षा दलांच्या सतत चकमकी घडत असतात. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात महिला कमांडो तैनात करण्यामागे कांही खास कारणे आहेत. महिला कमांडो तेथील स्थनिक महिलांशी सहज संवाद साधू शकतात आणि गुप्त माहिती मिळवू शकतात. यामुळे सुरक्षा दलांचा ग्रामीण नागरिकांशी असलेला संवाद वाढतो तसेच मानवाधिकार उल्लंघटनाच्या घटनाही कमी घडतात.
महिला कमांडो या भागात तैनात करण्याची योजना गतवर्षीच आखली गेली होती. केंद्रीय राखीव दलाकडे सर्वाधिक महिला कर्मचारी असून हा आकडा आहे ३ हजार. पुढील पाच वर्षात त्यात आणखी २ हजार महिला सैनिकांचा समावेश केला जाणार असल्याचेही समजते.