भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ६

kanha
कान्हा राष्ट्रीय उद्यान
मध्य भारतातील सातपुडा पर्वतराजीच्या मैकल भागात वसलेले हे कान्हा म्हणजे जगभरात नावाजलेले एक उत्कृष्ट राष्ट्रीय उद्यान. कान्हा, किसली आणि मुक्की हे याचे प्रमुख भाग समजले जातात. साल वृक्षांचे प्रमाण इथे जास्त असल्यामुळे भर उन्हाळ्यातही हिरवेगार जंगल आपण इथे बघू शकतो. विस्तीर्ण पसरलेली गवताळ माळराने आणि त्यात शेकडोंनी चरणारी हरणे हे इथले सामान्य दृश्य. वाघांप्रमाणेच इथे अस्वल, गवे, रानकुत्रे, बिबळे, चितळ, सांबर, हनुमान लंगूर असे अनेक प्राणी दिसतात. इथे सापडणारी बाराशिंग्यांची जात अख्ख्या जगात फक्त इथेच दिसते. काही वर्षांपूर्वी यांची संख्या जेमतेम ३५ एवढीच उरली होती. शिकार आणि त्यांना लागणारी गवताळ कुरणे यांचा नाश झाल्यामुळे त्यांच्यावर नामशेष व्हायची पाळी आली होती. मात्र वन खात्याच्या अथक परिश्रमांमुळे आज त्यांची संख्या ५०० हून अधिक आहे.

उत्तम काळ : डिसेंबर ते मे. उन्हाळ्याचे गरम महिने वन्य जीवन बघण्यासाठी उत्तम. कान्हा भागात प्राणी जास्त दिसत असल्यामुळे या जागी पर्यटकांची जास्त वर्दळ असते.

क्षेत्रफळ : १९४५.०० चौ. कि.मी.

अंतर : मंडला ६० कि.मी, जबलपूर १६५ कि.मी., नागपूर २६० कि.मी.

Leave a Comment