भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ४

bandipur
बंदिपूर अभयारण्य
कर्नाटकातील म्हैसूरच्या राजाचे खासगी शिकार जंगल म्हणून ओळख असलेले बंदिपूर हे 1974 साली प्रोजेक्ट टायगर या योजनेखाली अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. दक्षिण भारतातील हे लोकप्रिय राष्ट्रीय उद्यान अनेक दुर्मिळ जातीच्या प्राण्यांसाठी जसे प्रसिद्ध आहे तसेच ते हत्तींसाठीही प्रसिद्ध आहे. हत्ती, वाघ,गवे, आळशी अस्वले, चारशिंगी या व अशा प्राण्यांबरोबरच येथे 200 प्रकारच्या जातींचे पक्षीही आढळतात.चारशिंगी अतिशय दुर्मिळ आहेत तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय याच प्रकारात मोडणारे ढोल्सही येथे दर्शन देतात.

लाल डोळ्याची गिधाडे, भारतीय गिधाडे, तपकीरी घुबडे, गरूड, बहिरी ससाणे अशा प्रकारचे सहसा न दिसणारे पक्षीगण येथे पाहायला मिळतात तसेच रॅट स्नेक (हा बिनविषारी साप आपला वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड- त्याच्या घरातही एकदा शिरला होता), कोब्रा, फुरसे, असे विषारी साप नागही येथे वास्तव्यास आहेत. येथे जगभरात जितके हत्ती आहेत त्याच्या 1/5 हत्ती आहेत असे अनुमान आहे. या जंगलात दर्या आहेत, डोंगर आहेत आणि नद्याही आहेत. त्यामुळे या जंगलाची भ्रमंती हा एक खासा अनुभव आहे. जंगलात जाण्यासाठी दर तासाला बसेसही आहेत. त्या सफारी राईड देतात. जंगलात खासगी वाहनांना मात्र परवानगी नाही.

मैसूर येथून केवळ 55 किमी अंतरावर आहे. मात्र जवळचा विमानतळ बंगलोर येथे आहे. बंगलोर येथून 142किमी आहे. खरे सांगायचे तर बंगलोर हून येथे खासगी गाडीने जावे. जंगलाइतकाच हा रस्ता प्रवासही अतिशय देखणा आहे. येथे जाण्यासाठी हिवाळा चांगला सीझन सांगितला जातो मात्र वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन हवे असेल तर थोडा उन्हाळा सोसायची तयारी ठेवावी आणि मार्च ते मे हा सीझन निवडावा.

Leave a Comment