
मुंबई – भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यामुळे पक्षातच नाराजीचा सूर पसरल्यामुळे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून, याचा फटका भविष्यात निवडणुकांमध्ये बसेल, असा सूर भाजपमधील काही नेत्यांचे आहे.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार स्थापन केल्यानंतरचा पहिल्या विश्वासदर्शक ठरावात मतविभागणी केली असती, तर सरकारला किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे कळले असते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पडद्यामागे ठरलेले होते, ते आवाजी मतदानाच्या माध्यमातून लोकांपुढे आले. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, राष्ट्रवादीने भाजप सरकारला पाठिंबा दिला, अशी कबुली द्यावी लागली. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराबाबत विधिमंडळात आवाज उठविणारे भाजपचे नेते हे राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याचे समर्थन करीत होते. याबद्दल पक्षात अस्वस्थता आहे.
