मेडिसन स्क्वेअरप्रमाणेच अल्फोस एरिनावरही मोदी बोलणार

australia
सिडनी – अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर वर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या एतिहासिक भाषणाची पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियातील अल्फोस एरिना क्रिडा संकुलावरही होणार असून येथे १७ नोव्हेंबरला भारतीय समुदायाशी मोदी थेट संवाद साधणार आहेत. अमेरिकेपेक्षाही येथील सभा संस्मरणीय व्हावी यासाठी ऑस्ट्रलियातील भारतीय संस्था खास प्रयत्नशील आहेत.

भारताचे पंतप्रधान जी २० बैठकीसाठी आज सकाळी ऑस्ट्रेलियात पोहोचले असून त्यांचा हा दौरा १८ तारखेपर्यंत आहे. अल्फोस एरिनावर होत असलेल्या मोदींच्या सभेचे सूत्रसंचालन मिस इंडिया ऑस्ट्रेलिया राशी कपूर करणार असून २८ वर्षांत प्रथमच भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमासाठी २०० भारतीय संघटना एकत्र आल्या आहेत. त्यात तेलगू असो्, गुजराथी ब्राह्मण, ऑस्ट्रेलिया शीख संघटना आणि साऊथ एशियन फोरमचा समावेश आहे.

आयोजक बालेशसिंह धनखड यांनी दिलेल्या माहितीनुसार या सभेसाठी २३ हजार जणांनी अगोदरच नोंदणी केली आहे मात्र स्टेडियमची क्षमता १६ हजार लोकांचीच आहे. ग्रीष्मकालीन ऑलिंपिक २००० मध्ये हे अल्फोस एरिना स्टेडियम उभारण्यात आले होते व हे देशातील सर्वात मोठे क्रीडा संकुल आहे.

मोदींसाठी मेलबर्न ते सिडनी ही विशेष एक्स्प्रेस ट्रेन धावणार आहे. मेलबर्नच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे कोणत्याही पंतप्रधानांच्या नावाने विशेष गाडी सोडली जात आहे. यात प्रवाशांना मोदी ढोकळा व मोदी फाफडा या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे त्याचप्रमाणे नृत्य, संगीताचा आनंदही लुटता येणार आहे. ही गाडी तिरंगी फुगे, मोदींची पोस्टर्स तसेच भारतातील प्रमुख ठिकाणांच्या पोस्टर्सनी सजवली गेली आहे.

Leave a Comment