फिल्टर्ड पाण्याचा बर्फाचा गोळा

ice-gola
बर्फाचे गोळे तयार करून त्यावर साखरेचे रंगीत पाणी मारून ते विकणे. हा एक व्यवसाय आहे. म्हटले तर हा व्यवसाय हलका आहे आणि बर्फाचा गोळा पाच रुपयाला असल्यामुळे या धंद्यातून कमाई सुद्धा फार होत नाही. पण कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की, एमबीए झालेल्या एका श्रीमंत घरातल्या मुलाने मुंबईमध्ये बर्फाच्या गोळ्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून त्याला हजारो रुपये कमाई होते. कारण त्याचा एक बर्फाचा गोळा २५ रुपयाला असतो. जवळच्याच गाड्यावर हाच बर्फाचा गोळा पाच रुपयांना मिळत असताना याच तरुणाचा २५ रुपयांचा गोळा कोणी तरी का घेईल, असा प्रश्‍न आपल्याला पडू शकतो. परंतु या तरुणाने डोके लढवून हा व्यवसाय केला आहे.

त्याने एक गोष्ट पाहिली की, बर्फाचा गोळा खाणे हे काही प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात नाही. कोणताही लक्षाधीश माणूस मुंबईच्या चौपाटीवर किंवा कुठे तरी भेळच्या गाड्यांच्या आसपास असा बर्फाचा गोळा अजिबात खाणार नाही. यामागे त्यांची प्रतिष्ठा तर आडवी येतेच, पण बर्फ हेही त्याचे एक कारण असते. साधारण सुशिक्षित लोकांना एक गोष्ट माहीत आहे की, आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये बर्फ घालून खातो तो बर्फ घाणेरड्या पाण्याचा तयार झालेला असतो. लोक पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत एवढे जागरूक झालेले आहेत की, ते घराच्या बाहेर फिल्टर पाणी मिळाल्याशिवाय पाणी पीत नाहीत. मग हे लोक पाण्याच्या बाबतीत एवढे जागरूक असतील तर बर्फाच्या बाबतीत का असणार नाहीत? आणि हा बर्फ आपण पिऊ शकणार नाही अशा अशुद्ध पाण्यापासून केलेला असतो हे ज्यांना माहीत असते ते लोक उसाचा रस पिताना सुद्धा त्यात बर्फ घालू देत नाहीत.

मग असे लोक कितीही मोह झाला तरी वाटेल त्या पाण्याच्या बर्फाचा गोळा कसा खातील? म्हणजे पाण्याचा प्रश्‍न तर आहेच, पण रस्त्यावर उभे राहून खाण्यातली अप्रतिष्ठा सुद्धा आहेच. म्हणून या एमबीएस झालेल्या विद्यार्थ्याने मुंबईत जुहू चौपाटीच्या बाजूला थोडासा आसरा तयार करून म्हटले तर उघड्यावर आणि म्हटले तर झाकून असे आपले गोळा सेंटर उभे केले आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे एक बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डावर लिहिले आहे, ‘येथे वापरला जाणारा बर्फ हा फिल्टर पाण्याचा आहे.’ एवढ्या एका बोर्डमुळे त्याच्याकडे लोकांची एवढी गर्दी वाढायला लागली की, त्याने बर्फाचा गोळा २५ रुपयांना केला तरी कोणाला वाईट वाटेनासे झाले. कारण बर्फाच्या गोळ्यासाठी २५ रुपये खर्च करण्याची ऐपत असणार्‍यांचे फिल्टर्ड वॉटर आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टी त्याने सांभाळल्या होत्या.

Leave a Comment