न्यूमोनिया आणि डायरिया : बालकांचे मोठे ंशत्रू

pneumonia
आपल्या देशामध्ये बालकांच्या कुपोषणावर नेहमी चर्चा होत असते आणि पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे किती मुले मरण पावतात यांची आकडेवारी अधूनमधून जाहीर केली जात असते. त्याशिवाय क्षयरोग, मधुमेह आणि आजच्या काळातील एडस् हे लोकांचे मोठे शत्रू असल्याचे सांगितले जाते. या सगळ्या रोगांचा भारतातल्या जनतेला धोका आहे ही तर गोष्ट खरीच आहे. परंतु भारतीय बालकांचे सर्वात मोठे शत्रू हगवण आणि न्यूमोनिया हे दोन आजार आहेत. त्यांची चर्चा होत नसली तरी संयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या एका पाहणीमध्ये भारतात या दोन विकारांनी खूप मुले मरतात आणि ते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढचे एक मोठे आव्हान आहे असे दिसून आलेले आहे. २०१३ साली भारतात या दोन विकारांनी तीन लाख मुले मरण पावली आहेत, असे एका पाहणीत आढळले आहे.

यातल्या न्यूमोनिया हा विकार सतत सर्दी होण्याने झालेला असतो. आपल्या देशातल्या लहान मुलांची नाके सतत वाहत असतात. त्याकडे त्यांचे पालक फार गांभीर्याने पहात नाहीत. लहान मुलांचे नाक वाहणारच, कोणत्याही रोगाचा प्रतिकार करताना त्याची शक्ती खर्च होते आणि त्याचाच एक परिणाम म्हणून मुलांना अधूनमधून सर्दी होते. त्याशिवाय देशातल्या फार मोठ्या वर्गातील मुलांना थंडीपासून संरक्षण करता येईल असे पुरेसे गरम कपडे मिळत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून आणि सततची सर्दी यामुळे लहान मुलांत न्यूमोनियाचा विकार बळावतो.

डायरिया हा विकारही असाच काही अभावांमुळे निर्माण होतो. विशेषत: उघड्यावर शौच्याला बसणे आणि तसेच दूषित पाणी आणि दूध यांचे प्राशन करणे यातून डायरिया बळावतो. आपल्या देशातल्या जनतेला अजूनही शुद्ध पाणी मिळणे शक्य झालेले नाही. देशातल्या फार खेड्यांमध्ये अजूनही आडांचे, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. कधीही स्वच्छ न केल्या जाणार्‍या पाण्याच्या टाक्या, तसेच जेवणापूर्वी आणि शौच्याला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय नसल्यामुळे डायरिया बळावतो. लहान मुलांना त्यामुळे हगवण लागते. बर्‍याच मुलांमध्ये अशी हगवण लागली की, काही दिवसांनी ती आपोआप कमी होत असते, त्यामुळे पालक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु एखाद्या मुलाची हगवण थांबलीच नाही तर मोठ्या प्रमाणावर डी-हायड्रेशन होते आणि मुले दगावतात.

हे दोन विकार भारतात प्रामुख्याने लहान मुलांचे बळी घेतात. २०१३ साली केवळ न्यूमोनियाने पाच वर्षांच्या आतील १ लाख ७० हजार मुले मरण पावली आहेत. सार्‍या जगामध्येच न्यूमोनियाचे प्रमाण जाणवते. परंतु बर्‍याच प्रयत्नांनी त्याचे प्रमाण कमी झाले आहे. भारतात मात्र हे प्रमाण कमी होण्याची चिन्हे नाहीत. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या या संबंधातल्या अहवालामध्ये भारतात न्यूमोनिया आणि डायरियाचे प्रमाण कमी होण्यासाठी युद्ध पातळीवरून प्रयत्न केले गेले पाहिजे असे नमूद केले आहे. जगातल्या १५ देशांमध्ये याबाबतीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. असे असले तरी बरेच प्रयत्न करून या विकारांना प्रतिबंध घालता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे दोन्ही विकार स्वच्छतेशी निगडित आहेत आणि सरकारने स्वच्छतेचे अभियान वेगाने चालविण्याचा निर्धार केला आहे. भारतातल्या २७ राज्यांमध्ये या दोन विकारांचा प्रादुर्भाव आढळतो. मात्र लसी टोचण्याची व्यवस्था केली गेली तर हे प्रमाण कमी करता येते. भारत आणि नायजेरिया हे दोन देश न्यूमोनिया आणि डायरियाने सर्वाधिक बाधित झालेले आहे. केंद्र सरकारने आता दोन विकारांच्या विरोधातील उपाय योजना अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा निर्धार केला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment