दुबईत मॉडर्न ट्राम सेवा सुरू

tram
दुबई – जगातील ट्राम सेवा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असतानाच दुबईने अत्याधुनिक मॉडर्न ट्राम सेवा सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरू केली आहे. ही सेवा ११ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ही सेवा सुरू होण्यासाठी दुबईकरांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही सेवा जागतिक आर्थिक मंदीमुळे रखडली होती. गल्फ देशांतील अशा प्रकारची ही पहिलीच सेवा असून ही ट्राम १०.६ किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक १० मिनिटाला तर गर्दी नसताना ती दर १२ मिनिटांनी सुटणार आहे.

या ट्राममधील दोन डबे खास महिला व लहान मुलासाठी आहेत. आणखी एक डबा गोल्डन क्लास प्रवाशांसाठी आहे. एका ट्राममधून ४०५ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. दररोज ही ट्राम किमान २७ हजार प्रवाशांची नेआण करणार आहे. गाडीला सिल्व्हर क्लास डबेही आहेत. त्यासाठी ३ दिरर्हम तर गोल्डन क्लाससाठी ६ दिरर्हम चे तिकीट काढावे लागणार आहे. हे तिकीटदर सर्वात स्वस्त आहेत असेही सांगितले जात आहे.

ट्रामच्या कांही स्टेशन्सवर वातानुकुलित पुल, सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधाही दिल्या गेल्या आहेत. दुबई रोड ट्रान्स्पोर्ट अॅथॉरिटीच्या म्हणण्यानुसार ट्रामसाठी प्लॅटर्फार्म स्क्रीन दरवाजे आहेत. ट्रामचा प्रवास अतिशय सुरक्षित आणि आरामदायी आहे. चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात झालाच तर चालकाला ३० हजार दिर्‍र्हमचा दंड ठोठावण्याची तरतूदही नियमात करण्यात आली आहे. सध्या ११ ट्राम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत तर आणखी १४ ट्राम लवकरच दाखल होत आहेत.

Leave a Comment