आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

raj-thackary
मुंबई – भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. शिवसेनेशी फारकत घेतलेल्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भेट झाल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिकेतही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपने मनसेशी जवळीक वाढवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुपारी बाराच्या सुमारास शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसेच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आपण आभार मानण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली. बुधवारी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मनसेने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले होते. डेंग्यूचा फैलाव रोखण्यात अपयश आल्याचे सांगत सभात्याग केला होता. त्यावेळी भाजपनेही मनसेला साथ दिली होती.

Leave a Comment