इस्लामिक स्टेटचा खलिफा अबू बकर अल बगदादी अमेरिकेच्या विमान हल्ल्यात ठार झाला नसल्याचा दावा करणारा अबू बकरच्या आवाजातील ऑडिओ इस्लामिक स्टेटने सोशल साईटवरून प्रसारित केला आहे. मात्र हा ऑडिओ नक्की कधी रेकॉर्ड केला गेला असावा याचा कोणताही तपास लागलेला नाही. इराकी अधिकार्यांनी अबू बकर अमेरिकी विमानांच्या कडून करण्यात आलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असल्याचे व त्यात कदाचित तो ठार झाला असावा असे जाहीर केले होते. त्याला उत्तर म्हणून हा ऑडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
अबू बकर जिवंत असल्याचा दावा करणारा ऑडिओ प्रसारित
या ऑडिओत अबू बकरने अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचे आव्हान आपल्या सैनिकांना केले आहे. १७ मिनिटांच्या संदेशात तो म्हणतो, अल्लाचा आपल्याला लढाईचा आदेश आहे. आपल्याला बेइज्जती मान्य नाही म्हणून इस्लामिक स्टेटचा शेवटचा सैनिकही अखेरच्या श्वासापर्यत लढेल. याच संदेशात त्याने सौदी अरबिया आणि यमनवर हल्ले चढविण्याचा आदेशही दिला आहे. ऑडिओतील आवाज अबू बकरच्या आवाजाशी जुळता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.