भारतात केवळ ५ टक्के विवाह आंतरजातीय

wedding
भारतात विवाहातले जातीचे बंधन कमी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते पण प्रत्यक्षात अनेक समाज सुधारक स्वत:चे आणि आपल्या मुला मलींचे विवाह जमवताना जातीचाच विचार करतात. त्यामुळे आज मितीला भारतातले केवळ पाच टक्के विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ टक्के लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब आढळली आहे. अजूनही शहरातले ३० टक्के लोक आणि खेड्यातले ३० टक्के लोक अस्पृश्यता पाळतात. या सर्वेक्षणात या लोकांनीच स्वत: ही बाब स्पष्टपणे सांगितली आहे.
नॅशनल कौन्सील फॉर अप्लाईड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेेने एका परदेशी विद्यापीठाच्या मदतीने हे मनुष्यबळ विषयक सर्वेक्षण केले आहे. त्याचे निष्कर्ष अजूनही जाहीर करण्यात आलेले नाहीत पण एका इंग्रजी दैनिकाने ते मिळवून प्रसिद्ध केले आहेत. या सर्वेक्षणात समाजाच्या विविध गटांतील ४२ हजार कुटुंबांची पाहणी करण्यात आली. हे देशातले एक मोठे सर्वेक्षण मानले जात आहे. या पाहणीत १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या महिलांना त्यांचे लग्न जातीतच झाले आहे का असा प्रश्‍न विचारला असता त्यातल्या ५.४ टक्के महिलांनी नकारार्थी उत्तर दिले. आपला विवाह परजातीच्या पुरुषाशी झाला आहे असे त्यांनी नमूद केले. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.
२००४ साली अशीच पाहणी करण्यात आली होती. तेव्हा मध्य प्रदेशात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ एक टक्का दिसून आले होते. हे प्रमाण तेव्हा गुजरात आणि बिहारात सर्वात जास्त म्हणजे ११ टक्के होते. आताही या प्रमाणात आणि या क्रमांकात काही फरक पडलेला नाही. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत अजूनही मध्य प्रदेश मागे आहे तर गुजरात आणि बिहारची आघाडी कायम आहे.
अस्पृश्यतेचे पालन म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न होता. तेव्हा सर्वेक्षण करणारांनी लोकांना याबाबत असा प्रश्‍न विचारला होता की ते अस्पृश्य समाजातल्या व्यक्तीला आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश देता का आणि त्यांना आपली भांडी वापरायला देता का ? या प्रश्‍नाचे उत्तर शहरातल्या २० टक्के लोकांनी ‘नाही’ असे दिले तर खेड्यातल्या ३० टक्के लोकांनी तसेच उत्तर दिले. याचा अर्थ असा की, शहरातल्या पाचपैकी एकजण तर खेड्यातल्या तिघांपैकी एकजण अजूनही अस्पृश्यता पाळतो. अस्पृश्यता पाळणारांमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हा भेदभाव शहरातले ६२ टक्के ब्राह्मण आणि खेड्यातले ३९ टक्के ब्राह्मण अजूनही पाळतात. याबाबत अन्य मागासवर्गीय आणि ब्राह्मणेतर उच्चवर्णीय यांचा क्रमांक लागतो.

Leave a Comment