नेत्यांमुळेच झाली मनसेची वाताहत!

mns
मुंबई – विधानसभा निवडणुकीत मनसेचा पाडाव झाल्यानंतर पक्षात पूर्णतः मरगळ निर्माण झाली. या स्थितीत पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी मनसेचे शेकडो कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जमले. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या उत्साही कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्यात गमावलेला आत्मविश्वास ​निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपण राज्यात दौरा काढणार आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला.

विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या मनसेचा एकुलता एक आमदार निवडून आला. त्यानंतर पक्षातील काही नेत्यांनी राजीनाम्याचे सत्र चालवल्यानंतर कार्यकर्ते पार खचून गेले आहेत. अशावेळी पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते स्वतःहून सोमवारी सकाळपासून कृष्णकुंज येथे एकत्र आले.

राज ठाकरे यांनी या सर्वांशी दुपारी सुमारे एक ते दीड तास संवाद साधत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात दौरा काढणार आहे, तेव्हाही आपण बोललो असतो, असे सांगत ठाकरे यांनी तुम्ही आलाच आहात, तर बोला, असे त्यांनी सांगितले. यानंतर प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर कार्यकर्ते परतले.

मात्र काही नेत्यांमुळे पक्षाची वाट लागली आहे, असा आरोप काही कार्यकर्ते करत होते. त्याचवेळी गर्दीतून एक भिरभिरता दगड एका सरचिटणीसाच्या गाडीच्या दिशेने फेकण्यात आला. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मात्र याप्रकारे दगड फेकण्यात आला नसून जवळ सुरू असलेल्या बांधकामामुळे एखादा दगड पडल्याचे स्पष्टीकरण दिले.

Leave a Comment