तेलउद्योजक हेराल्ड हॅमचा महागडा घटस्फोट

herold
लोक लग्नासाठी केवळ हौस म्हणून कोट्यावधी रूपयांचा चुरा करतात पण घटस्फोटासाठीही भलीभक्कम रक्कम मोजावी लागते हे आजचे सत्य आहे. अमेरिकेतील तेल व्यापारी व उद्योजक हेरॉल्ड हॅम यांचा घटस्फोट जगातील महागडा घटस्फोट ठरला आहे. या घटस्फोटापायी हेरॉल्ड यांना पत्नी सूएन हिला १ अब्ज डॉलर्सची पोटगी देण्याचे आदेश ओकलाहामा येथील न्यायाधीशांनी दिले आहेत. रूपयांत ही रक्कम होते तब्बल ६१५४ कोटी रूपये. विशेष म्हणजे या पोटगीमुळे सूएन अमेरिकेतील श्रीमंत महिलांच्या यादीत सामील होणार आहे.

६८ वर्षीय हेरॉल्ड यांचा जन्म अगदी गरीब परिवारातला. मात्र स्वकर्तृत्वावर त्यांनी उद्योग उभारला. त्यांनी १९६७ साली काँटीनेंटल रिसोर्सेस या ऑईल कंपनीची स्थापना केली. त्यांचा विवाह सूएन यांच्याबरोबर १९८८ ला झाला. त्यांना दोन मुली आहेत. पत्नी सूएन ही अर्थशास्त्रज्ञ आणि वकील आहे. हेरॉल्ड यांच्याकडे कंपनीचे ६८ टक्के शेअर्स असून त्यांची मालमत्ता आहे १८ अब्ज डॉलर्स. फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार श्रीमंतांच्या यादीत ते अमेरिकेत २४ व्या तर जगात ७४ व्या स्थानावर आहेत.

यापूर्वी महागड्या घटस्फोटांच्या यादीत रशियाचे उद्योगपती राबोलाववेव यांनी पत्नी इलीना हिला घटस्फोट देताना ४.८ अब्ज डॉलर्स दिले होते. फ्रान्सचे उद्योगपती एलेन विल्डस्टाइन यांनी पत्नी जोसलीन हिला भरपाईपोटी २.५ अब्ज डॉलर्स दिले होते. तर मिडीया मुगल रूपर्ड मर्डोक यांनी दोन बायकांना घटस्फोट देताना प्रथम पत्नी मारिया हिला १.७ अब्ज तर दुसरी पत्नी वेंडी हिला १.८ अब्ज डॉलर्स पोटगी म्हणून दिले आहेत.

Leave a Comment