उद्योग तर अनेक आहेत, ते करणार्‍यांची कमतरता आहे

self
बिनभांडवली हे पुस्तक लिहिण्यासाठी बरेच चिंतन केले आणि एक गोष्ट लक्षात आली की, आपण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना बिनभांडवली उद्योग सुचवून उद्योगधंदा करण्यास प्रवृत्त करत असलो तरी या पुस्तकात आपण जेवढे बिनभांडवली उद्योग दिले आहेत तेवढेच उद्योग या समाजात उपलब्ध आहेत असे नाही. आपण समाजाच्या गरजा लक्षात घ्यायला लागलो आणि समाज कस कसा बदलत चालला आहे याची दखल घ्यायला लागलो तर या निरीक्षणातून आपल्याला अनेक नवनवे उद्योग आपोआपच सुचायला लागतील. त्यादृष्टीने मीही समाजाच्या गरजा हेरायला लागलो आणि असे लक्षात आले की, बिनभांडवली उद्योग तर खूप आहेतच, पण थोडेबहुत भांडवल गुंतवूनही अनेक उद्योग करता येतात.

फिल्टर्ड वॉटर
सध्याच्या जगामध्ये लोक पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विलक्षण जागरूक झाले आहेत. नगरपालिका किंवा महानगरपालिका आपल्याला पिण्याचे पाणी म्हणून जे पाणी पुरवते ते पुरेसे शुद्ध नाही. त्यामध्ये अनेक अशुद्ध घटक आहेत. त्यामुळे लोक आपापल्या घरात फिल्टर ठेवून फिल्टर केलेले पाणीच प्यायला लागले आहेत. मात्र सर्वांनाच असे फिल्टर घेता येईल असे नाही. तेव्हा एखाद्या कॉलनीमध्ये एखाद्या तरुण मुलाने २०-२५ हजार रुपये गुंतवून थोडा मोठा फिल्टर खरेदी केला तर तो त्याच्या माध्यमातून आपल्या शेजारपाजारच्या लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी पुरवू शकतो. त्याला यासाठी फार खर्च येत नाही आणि एक ते दोन रुपये प्रती लिटर या दराने पाणी पुरवले तर लोकही ते पाणी खरेदी करू शकतात. पोटाच्या विकारांनी त्रस्त होण्यापेक्षा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी दररोज १० ते २० रुपये खर्च करणे कधीही चांगलेच. लोकांना हे पटवून देण्यासाठी असा व्यवसाय करणार्‍यांनी लोकांचे पाणी तपासून ते किती अशुद्ध आहे हे दाखवून द्यावे. ते दाखविण्याची साधने बाजारात उपलब्ध असतात. आपण पीत असलेले पाणी किती अशुद्ध आहे हे कळल्यास फिल्टरचे पाणी विकत घ्यायला कोणीच मागेेपुढे पाहणार नाही. दररोज साधारणत: १५० ते २०० लिटर पाणी आपल्या घराच्या जवळच्या घरातून पुरवले तरी घरातल्या घरात एक छोटासा का होईना पण व्यवसाय उभा राहू शकतो आणि या व्यवसायाविषयी आत्मविश्‍वास वाढीला लागला की, त्याचे स्वरूप आपण वाढवू शकतो.

पुणे जिल्ह्यातल्या शिरूर या गावामध्ये एका तरुणाने एका टेंपोवर असे फिल्टर बसवलेले आहे आणि तो दोन रुपये लिटर दराने घरोघर जाऊन पाणी पुरवत असतो. असे अनेक व्यवसाय आपल्याला सुचायला लागतात. थोडी भांडवल गुंतवायची क्षमता असेल तर अनेक विषय सुचायला लागतात.

स्पोर्टस् शूजची लॉन्ड्री
कोणत्याही सुशिक्षित तरुणाला बूट पॉलिशचा व्यवसाय कर म्हटल्यानंतर ते अपमानास्पद वाटेल. परंतु एक बूट पॉलिशचा वेगळा उद्योग मी सुचविणार आहे. सामान्यपणे आपण बूट पॉलिश म्हणतो, ते बूट पॉलिश म्हणजे कातड्याच्या बुटांचे पॉलिश असते. परंतु आजकाल पहाटे फिरायला जाणारे किंवा जॉगिंगला जाणारे लोक अतीशय महागडे स्पोर्टस् शूज खरेदी करायला लागले आहेत. या बुटांच्या किंमती काही वेळा पाच ते सहा हजार रुपये अशाही असतात आणि हे बूट कॅनव्हासचे असतात. त्या बुटांच्या तळव्यामध्ये भारी रबर वापरलेले असते. असे बूट खराब झाले म्हणजे नेमके काय करावे हे लोकांना समजत नाही. मग काही लोक बूट मजबूत असूनही तो साफ कसा करावा हे समजत नसल्यामुळे तो फेकून देतात. पुण्यातल्या एका तरुण मुलाने या बुटांना स्वच्छ करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. खरे म्हणजे हे एक प्रकारचे बूट पॉलिशच आहे आणि म्हटले तर लोकांचे जोडे स्वच्छ करण्याचे काम असल्यामुळे ते हलके आहे. पण याच कामाला या मुलाने स्पोर्टस् शूजची लॉन्ड्री असे म्हटले आहे. असे इंग्रजी नाव दिल्याबरोबर या धंद्याचे महत्व वाढले आणि निरनिराळे साबण वापरून तो हे स्पोर्टस् शूज एकदम नव्यासारखे करून द्यायला लागला. एका बुटाच्या जोडीला स्वच्छ करण्यासाठी १०० रुपये दर लावला तरी लोकांना तो जास्त वाटत नाही. मात्र अतीशय अल्प भांडवलात एका तरुणाला या रुपाने स्वत:च्या पायावर उभे राहता येते.

Leave a Comment