फडणवीस यांनी सुरक्षा कमी करण्याची केली विनंती

devendra
मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सध्या देण्यात येत असलेली झेड सुरक्षा कमी करून वाय सुरक्षा द्यावी अशी विनंती गृहमंत्र्यालयाकडे केली आहे. त्याचबरोबर आपल्या मुलीसाठी दिली गेलेली पोलिस सुरक्षाही काढून घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

गेली १२ वर्षे आमदार असलेल्या फडणवीसांनी कधीच पोलिस संरक्षण घेतलेले नाही. सध्याची झेड सुरक्षा आपल्याला अडचणीची होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आपली मुलगी दिविजा ही लहान असल्याने आमच्याबरोबरच राहते व त्यामुळे तिलाही वेगळे पोलिस संरक्षण नको असेही त्यांनी कळविले आहे. राज्यात नक्षलग्रस्त भागात असलेला धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरविली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा कमी करण्याची विनंती गृहमंत्रालयाला केली असली तरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती याविषयीचा निर्णय घेणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरला वास्तव्य असताना आपण आपल्या घरातच राहू असेही कळविले असून तेथील रामगिरी बंगला कार्यालय म्हणून वापरण्यात येईल असेही जाहीर केले आहे. मुख्ममंत्री त्यांच्या मुंबईतील वर्षा या सरकारी निवासस्थानात राहण्यासाठी गेले आहेत मात्र सध्या ते तेथे एकटेच आहेत. त्यांच्या बँक अधिकारी असलेल्या पत्नीची नागपुरातून मुंबईला बदली झाल्यानंतरच ते सहकुटुंब वर्षावर राहतील असेही समजते.

Leave a Comment