अमेरिकी विमान हल्ल्यात अबू बगदादी ठार?

abubakr
मोसूल – अमेरिकी विमानांनी रविवारी इराकमधील मोसूल येथे कार ताफ्यांवर केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा खलिफा अबू बक्र अल बगदादी ठार झाला असल्याचे वृत्त आहे. अमेरिकी अधिकार्‍यांनी अजून या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी बगदादी ठार झाला असावा अथवा गंभीर जखमी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमेरिकी लढाऊ विमाने आणि त्यांना सहकार्य करणारी फ्रान्स व अन्य देशांची विमाने सातत्याने इराकमधील इस्लामिक स्टेटच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले चढवित आहेत. रविवारी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांची एक बैठक मोसूल येथे होणार होती. त्यासाठी बगदादीसह अनेक नेते उपस्थित राहणार होते. त्यांना घेऊन जाणार्‍या दहा सशस्त्र वाहनांच्या ताफ्यावर अमेरिकी विमानांनी बाँम्ब फेकल्याने ही दहाही वाहने नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच बगदादी ठार झाला असावा असे समजते.

इराक आणि सिरीयातील कांही भागावर कब्जा केल्यानंतर इस्लामिक स्टेटचा खलिफा म्हणून स्वतःची घोषणा करणारा अबू बगदादी जुलैनंतर फारच थोड्या सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिला आहे. जुलैत खलिफा म्हणून स्वतःला घोषित करताना तो एका मशिदीत दिसला होता. जगातील सर्व मुस्लीमांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली एकत्र यावे असे आवाहनही त्याने केले होते. बगदादीवर अमेरिकेने १ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

इसिसने इराकच्या अनबर भागात इसिसविरोधात लढण्यासाठी उतरलेल्या सुमारे ३०० जणांची सार्वजनिक हत्या केली होती. त्यानंतर इसिसवरील हल्ले अधिक तीव्र करण्यात आले आहेत.

Leave a Comment