
हैदराबाद – हैदराबाद येथील वनडेत श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात करीत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. सलामीवीर शिखर धवन (९१) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (५३) धावा भारतीय खेळाचे वैशिष्ट्ये राहिले. भारताने यापूर्वी कटक आणि अहमदाबाद वनडेत श्रीलंकेवर मात केली होती. आता मालिकेतील पुढचा सामना १३ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होईल.
हैदराबादेत देखील श्रीलंकेला धुतले
तत्पूर्वी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ४८.२ षटकांत सर्वबाद २४२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २४५ धावा काढून लक्ष्य गाठले.
श्रीलंकेच्या धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली. अजिंक्य रहाणे (३१) आणि शिखर धवन (९१) यांनी ११.६ षटकांत ६२ धावांची अर्धशतकी सलामी दिली. रहाणे ३१ धावा काढून परेराच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणेने ४७ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार मारले. तिस-या क्रमांकावर आलेल्या अंबाती रायडूने या वेळी ३५ धावांचे योगदान दिले. रायडूने ४६ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार मारले. रायडून धावबाद झाला. रायडू आणि धवनने दुस-या विकेटसाठी महत्त्वपूर्ण अशी ६९ धावांची भागीदारी केली. भारताच्या २ बाद १३१ धावा झाल्या असताना रायडू पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने धवनला शतकाची संधी होती. मात्र, त्याचे शतक ९ धावांनी हुकले. तो ९१ धावा काढून बाद झाला. कुलशेखराच्या चेंडूवर यष्टिरक्षक संगकाराने त्याचा झेल घेतला. धवनने ७९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आिण १ षटकारासह ही खेळी केली. दुसऱ्या टोकाने कोहलीने अर्धशतक साजरे केले. विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना कोहली (५३) बाद झाला. सुरेश रैनाने नाबाद १८ तर वृद्धिमान साहाने नाबाद ६ धावांचे योगदान दिले.
