राजस्थानातील पुष्कर मेळा

pushkar
दरवर्षी कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत राजस्थानातील पुष्कर येथे मोठा मेळा भरविला जातो आणि भारतात भरणार्‍या १० मोठ्या मेळ्यात याचा समावेश आहे. हा मेळा राजस्थानात नुकताच पार पडला असून त्याला परदेशी नागरिकांसह लक्षावधी भारतीय नागरिकांनी भेट दिली आहे.

पुष्कर येथील पवित्र पुष्कर सरोवरात या मेळ्यानिमित्ताने हिंदू भाविक पवित्र स्नान करतात. देशातील ब्रह्माचे एकमेव मंदिर या ठिकाणी आहे. या पुष्कर सरोवरातूनच ब्रह्माची उत्पत्ती झाली असे मानले जाते. या मेळ्यानिमित्ताने येथे उंटांचा मोठा बाजार भरतो. उंट सजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात तसेच त्यांच्या शर्यतीही होतात. दरवर्षी येथे साधारण ५० हजार उंटांची खरेदीविक्री होते. त्याचबरोबर गायी, शेळ्या, मेंढ्या या सारख्या प्राण्यांचीही खरेदी विक्री केली जाते.

मेळ्यात अनेक आकर्षणे असतात. राजस्थानी लोकनृत्ये, गाणीबजावणी, लांब मिशा स्पर्धा, विविध प्रकारचे खास राजस्थानी खाद्यपदार्थ यांची रेलचेल असते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. टॅटू बनविणे, मेंदीरेखन, कठपुतळ्यांचे खेळ यांचा आनंद मनमुराद लुटला जातो. राजस्थानचा हा रंगबिरंगी मेळा अनुभवण्यासांठी परदेशातून येणार्‍या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे रस्सीखेचीसारख्या खेळांत हे परदेशी मोठ्या संख्येने सहभागी होतात. पारंपारिक तरीही कलात्मक वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Leave a Comment