राष्ट्रवादी, शिवसेनेत गुफ्तगू

pawar
मुंबई – शुक्रवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत अज्ञात स्थळी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतल्याचे वृत्त असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या बैठकीविषयी दोन्ही पक्षांकडून मौन बाळगले गेले असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. अर्थात काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिबा देण्याच्या तयारीत आहे का याविषयी कांहीच माहिती मिळू शकलेली नाही. भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने ही खेळी खेळल्याचेही सांगितले जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सेनेला केंद्रातील मंत्रीमंडळ विस्तारात सेनेने त्यांच्या दोन खासदारांची नांवे सचविण्यासाठी फोन केल्यानंतर सेनेत कांही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सेनेने प्रथम राज्यातील राजकारणात आमचा वाटा सांगा असे कारण देऊन नांवे सुचविण्यास नकार दिला असल्याचेही समजते. भाजपच्या वरीष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सेनेने उपमुख्यमंत्रीपदासह १० मंत्रीपदांची मागणी केली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करणे शक्य नाही. सेनेने समजूत दाखविली तर ५-६ मंत्रीपदे त्यांना दिली जातील. मात्र सेनेतील नेत्यांतच अंतर्गत मतभेद आहेत.

सेनेतील कांही नेत्यांनी सेनेने विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली तर पुढील पाच वर्षात सेनेची हालत अधिकच खराब होईल असे मत व्यक्त केले आहे. सेना नेते उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांची मते विचारात घेत आहेत व त्याचवेळी राष्ट्रवादीशी सलोखा करण्यासंबंधीही चाचपणी करत आहेत. याचा अंतिम निकाल रविवारपर्यंत लागेल असे समजते.

Leave a Comment