फेसबूक, ट्विटर, युट्युबवरील चीनने बंदी उठवली

china
बीजिंग – ऍपेक परिषदेपूर्वी फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्‌सवरील बंदी प्रथमच उठविण्याची घोषणा चीनने केली असून, त्याचबरोबर परिषदेच्या ठिकाणी तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्यासंबंधी वेब सर्च करण्याचीही परवानगी दिली आहे.

द एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन फोरमच्या मीडिया सेंटरमधील पत्रकारांना ट्विटर, फेसबूक आणि युट्युब व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट या सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा वापर करण्याची परवानगी चीनने दिली. देशाच्या इतर भागांमध्ये या सोशल नेटवर्किंग साईट्‌वर चीन सरकारने बंदी घातली आहे. चीनने एखाद्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान इंटरनेवरील निर्बंध शिथिल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या परिषदेपूर्वी ऍपेकच्या अधिकार्‍यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या कॉन्फरन्स सेंटरमध्ये बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगातील इतर काही नेते हजेरी लावणार आहेत.

Leave a Comment