पर्रिकरांचा आज राजीनामा

parikar
पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करत असून ते दिल्लीत केंद्र सरकारात मंत्रीपद स्वीकारण्यासाठी रवाना होत आहेत. पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जात असल्याचे सांगितले जात आहे.

आज सकाळी स्पीकर राजेंद्र आर्लेकर यांनी ही माहिती दिली असून त्यापूर्वी सत्ताधारी भाजपच्या २१ आमदारांची बैठक पार पडल्याचेही वृत्त आहे. पर्रिकरांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, राज्य आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पर्सेकर व स्पीकर राज्रेंद्र आर्लेकर हे मुख्य दावेदार आहेत. त्याचवेळी पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली गेली तर आपण स्वच्छ, पारदर्शी आणि खुला कारभार करू असे आश्वासन दिले आहे.

एका मुलाखतीत पर्रिकर म्हणाले की ९ नोव्हेंबरला त्यांना राजकारणात येऊन २० वर्षे पूर्ण होत आहेत मात्र या संपूर्ण कालावधीत त्यांच्यावर एकही आरोप अथवा डाग लागलेला नाही. मला कोणते मंत्रालय दिले जाईल हे माहिती नाही मात्र पक्ष देईल ती जबाबदारी आपण नेकीने पार पाडणार आहोत. वास्तविक राज्यात राहण्यात मला अधिक आनंद आहे मात्र पक्षशिस्त म्हणून आपण केंद्रात जाण्यासही तयार आहोत असेही ते म्हणाले.

Leave a Comment