किचन गार्डन व्यवस्थापन

garden
भाजीपाल्याचे दर वाढले की लोक अस्वस्थ होतात. भाज्या खाणे परवडत नाही म्हणून कुरकूर करायला लागतात. परंतु लोकांना एक गोष्ट माहीत नाही की, आपल्या घरासमोरच्या छोट्याशा मोकळ्या जागेत आपण हौस म्हणून थोडाबहुत भाजीपाला लावला तरी चार ते पाच माणसांची भाज्यांची गरज सहजपणे भागू शकते. सध्याच्या काळात फ्लॅट संस्कृती वाढलेली आहे आणि अशा प्रकारचे किचन गार्डन करण्याएवढी मोकळी जागा उपलब्ध होईनाशी झाली आहे. तेव्हा अशा लोकांचा प्रश्‍न असतो की, आम्ही किचन गार्डन कसे करावे? त्यांचा प्रश्‍न बरोबर आहे. पण त्यांच्यासाठीही एक गोष्ट सांगितली पाहिजे की, घरच्या पुरता भाजीपाला पिकविण्याकरिता मोकळ्या जागेचीच गरज आहे असे काही नाही. घरातल्या घरात कुंड्यांमधून किंवा लाकडी खोक्यातूनही भाजीपाला लावता येतो. पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बरेच लोक असा भाजीपाला लावतही असतात. त्यांचे अनुकरण करण्यासाठी म्हणून काही लोक प्रयत्न करतात. परंतु अशा प्रकारचे किचन गार्डन लावून त्याची सारी मशागत करायचे म्हटले की त्याच्यासाठी जो आटापिटा करावा लागतो तो त्यांना करणे होत नाही आणि थोड्याच दिवसात अडचणी समोर दिसायला लागून त्यांचा उत्साह मावळतो.

अशा लोकांची ही अडचण ध्यानात घेऊन कोणाही सुशिक्षित बेकाराला किचन गार्डन व्यवस्थापनाचा व्यवसाय उभा करता येईल. लोकांच्या जागेचा वापर त्यांनी कसा करावा याबाबत या व्यवसायातून मार्गदर्शन करता येते. किचन गार्डन करू इच्छिणार्‍यांचे दोन प्रश्‍न असतात. पहिला म्हणजे त्यांना त्या बागकामाची तांत्रिक माहिती नसते. कोणते बी आणावे? कोठून आणावे? त्यासाठी जमीन कशी तयार करावी याबाबतीत लोक अज्ञानी असतात. तेव्हा या व्यवस्थापनाच्या व्यवसायातून ही माहिती लोकांना देता येते. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे किचन गार्डन परवडत नाही. कारण किचन गार्डनमध्ये एखाद्या छोट्याशा जागेत भेंडीची चार झाडे लावलेली असतात. वांग्याची दोन झाडे लावलेली असतात. एखादा घोसावळ्याचा किंवा कारल्याचा रोप लावलेला असतो. शिवाय थोडीशी कोथिंबीर, एखादी पेंडी भरून पालक होईल एवढे पालकाचे बी असा सारा छोटा छोटा मामला असतो. परंतु यातून सुद्धा कुटुंबाचा भाजीपाला होत असतो. एकूण १५ ते २० स्क्वेअर फूट एवढी जागा उपलब्ध होईल एवढे कुंडे तयार करून त्यात भाजीपाला सातत्याने लावत गेलो की, आपल्या गरजेपुरता भाजीपाला तयार होऊ शकतो. पण लोकांचा प्रश्‍न इथेच येतो.

आपल्या पुरती वांग्याची, टोमॅटोची, मिरचीची दोनच रोपे आणणार कोठून? आणि त्यामध्ये सातत्य रहावे म्हणून वेळोवेळी त्यांची लागवड करणार कोण? पालकाचे आपल्यापुरतेच बी मिळणे शक्य आहे का? आपण असे बी घ्यायला गेलो की, दुकानदार कमीत कमी २० रुपयांचे बी घेतले पाहिजे असे म्हणतो. तेवढे बी तर आपल्याला लागत नाही. मग त्यासाठी २० रुपये घालण्यापेक्षा सरळ बाजारातून भाजी आणलेली काय वाईट, असा विचार आपण करतो आणि किचन गार्डन लावण्यातला उत्साह मावळतो. बियांच्या आणि रोपांच्या अशा अडचणीवर मात केली तरी पुढे उत्साह मावळण्याचा आणखी एक प्रसंग येतो. एखादे झाड लावल्यानंतर त्यावर कीड पडते. अशा किडींचा बंदोबस्त करायचा म्हटला की, घरात किमान पाच ते सहा प्रकारची कीटकनाशके आणि ती फवारण्यासाठी एक स्प्रे पंप हे सगळे आणणे अपरिहार्य ठरते. अशी पाळी आली की, मुळात त्या कीटकनाशकांची माहिती नसते आणि त्यांच्या बाटल्या आणि डबे फार महाग असतात. मग तिथे आपण असा विचार करतो की, ही कीटकनाशके आणण्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा सरळ बाजारातून भाजी आणलेले काय वाईट?

लोकांना घरच्या घरी भाजी हवी असते. घरच्या भाजीचे कौतुक सर्वांना असते. शिवाय त्यातून पैशाची बचत होते. पण उत्साह मावळण्याचे हे प्रसंग येतातच. तिथे एक बिनभांडवली उद्योग निर्माण होतो. एखाद्या सुशिक्षित तरुणाने अशा भाजीपाल्याच्या लागवडीची प्राथमिक माहिती करून घेऊन लोकांच्या घरोघर किचन गार्डन्स् निर्माण केल्या तर त्याला एक छान काम मिळते. तो विविध प्रकारच्या बियाणांची खरेदी ठोकमध्ये करेल. त्यासाठी लोकांकडूनच ऍडव्हान्स पैसे घेईल आणि त्यातून बियाणे, कीटकनाशके, स्प्रे पंप आणि रोपे यांची खरेदी करू शकेल. आपल्या किचन गार्डनला पाणी देणे हे लोकांचे काम असे. पण हा व्यवसाय करणारा तरुण त्यांना रोप लावून देणे, कीटकनाशके फवारणे या सेवा देईल. लोकांना रोपांना पाणी द्यायला फार आवडते, पण बाकीच्या गोष्टींची मेहनत त्यांना करता येत नाही. तेव्हा त्यांची ही अडचण ओळखून एखाद्या तरुणाने हा व्यवसाय सुरू केला तर त्याला लोक चार पैसे शुल्क द्यायला तयार होतील. कारण लोकांची त्यातून घरची भाजी खाण्याची हौस भागत असते. अशा भाज्यांच्या किचन गार्डनचे व्यवस्थापन करत असतानाच हळूहळू फुलांच्याही बागांचे व्यवस्थापन करायला लागलो तर शिक्षकाएवढा पगार देणारे उत्पन्न सहज मिळू शकते. शिवाय असा व्यवसाय करणार्‍यांची लोकप्रियताही वाढते.

Leave a Comment