ओसामाचा खात्मा करणारा कमांडो जगासमोर

neil
वॉशिग्टन – अल कायदाचा म्होरक्या आणि कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानातील अबोटाबाद येथील घरात शिरून खात्मा करणारा अमेरिकन नेव्हीचा सील कमांडो तीन वर्षांच्या अज्ञातवासानंतर आणि आथिॅक तंगीमुळे बेजार झाल्यामुळे आपली खरी ओळख देण्यासाठी प्रवृत्त झाला असून त्याची मुलाखत फॉक्स टिव्हीवर दोन भागात प्रसारित होणार असल्याचे वृत्त आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार ओसामा कारवाईत अमेरिकन नेव्ही सील कमांडोच्या २५ सदस्यांच्या टीमचे नेतृत्व करणारा कमांडो रॉबर्ट ओ नील यानेच ओसामाच्या डोक्यात तीन गोळ्या घातल्या होत्या.ओसामाच्या खात्म्यानंतर या कमांडोची ओळख गुप्त ठेवली गेली होती. मात्र त्यानंतर अमेरिकन सरकारने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे लाभ त्याला दिले गेले नाहीत तसेच त्याला आरोग्य सुविधाही दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक तंगीने बेजार झालेल्या ओ नीलने आपली ओळख सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून तो फॉक्स टिव्हीवर मुलाखत देण्यासाठी तयार झाला आहे.

त्याच्या या निर्णयामुळे अमेरिकन संरक्षण विभागात एकच खळबळ उडाली असल्याचेही समजते. ओ नीलवर उच्च स्तरीय गुप्त माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी दावाही दाखल केला जाऊ शकेल असेही सांगितले जात आहे. मात्र ओ नील च्या वडीलांच्या मते तो ज्या अडचणींना सध्या सामोरा जात आहे ते पाहता ओळख लपविण्याची कांहीही गरज उरलेली नाही. अल कायदाच्या अतिरेक्यांकडून त्याला धोका होण्याची शक्यता नक्कीच आहे मात्र जे घडेल त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.

रॉबर्ट ओ नील ने संरक्षण विभागात १६ वर्षांची सेवा पूर्ण केली असून इराक, अफगाणीस्थानासह सुमारे ४०० सैनिकी कारवायात त्याने भाग घेतला आहे. त्याला नोन वेळा सिल्व्हर स्टार व ५२ विविध शौर्य पदके मिळाली आहेत. सिल्व्हर स्टार हा अमेरिकी सेनेतील मोठा सन्मान समजला जातो. ओसामा कारवाईनंतर त्याने संपूर्ण देशभर भ्रमण केले आहे.

Leave a Comment