आयुष्याची दोरी कधी तुटणार हे सांगणारे अॅप

mrutyu
माणसाला सर्वाधिक भीती वाटते किंवा अस्वस्थता येते ती मृत्यूच्या विचाराने. मृत्यू नक्की कधी येणार हे कुणीच कधी सांगू शकत नाही असे म्हटले जात असले तरी डिजिटल क्रांतीमुळे रोज नवीननवीन जे शोध लागत आहेत त्यात तुमच्या मृत्यूची घटीका कधी आहे हे सांगणारे अॅपही संशोधकांनी तयार केले आहे. डेडलाईन नावाचे हे अॅप अॅपल हेल्थ किट टूलचे विश्लेषण करून तुमच्या आयुष्याचे किती दिवस बाकी आहेत हे सांगू शकते असा अॅप कर्त्यांचा दावा आहे.

अॅपल हेल्थ किट टूलमध्ये युजरचे शरीर, रक्तदाब, त्याच्या दिवसभरातील शारिरीक हालचाली, जीवनशैली यांच्या नोंदी करून रेकॉर्ड केल्या जातात. त्याचे विश्लेषण हे अॅप करते आणि त्यावरून तुमच्या मृत्यूचा दिवस आणि वेळ सांगू शकते असा संशोधकांचा दावा आहे. अर्थात ही वेळ अचूकच असेल असे नाही मात्र त्याचा अंदाज अचूक असू शकतो असे निर्माता गिस्ट एलएलजी याचा दावा आहे.

हे अॅप तुमचा मृत्यू कधी आहे हे सांगण्याच्या उद्देशाने विकसित केलेले नाही तर तुमच्या जीवनशैलीमुळे मृत्यू लवकर येणार असेल तर त्याची जाणीव करून देणे आणि तो आणखी दूर जावा यासाठी तुमच्या जीवनशैलीत, आहारविहारात काय बदल करणे आवश्यक आहे याचा सल्ला देण्यासाठी आहे असे गिस्टचे म्हणणे आहे. तुम्हाला तातडीने तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे असेल तर त्याची सूचनाही हे अॅप देते.

Leave a Comment