आता शनिवारीही मन:स्ताप!

local
मुंबई : मध्य रेल्वेवर अभियंत्रिकी कामासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल होतात. त्यातच आता रविवार पाठोपाठ येत्या शनिवारीही छोटा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुढच्या काही आठवड्यातील शनिवार-रविवारीही मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हा मेगाब्लॉक ठाणे-दिवा या स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत तर दिवा-कल्याण स्थानकादरम्यान सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत घेण्यात येणार आहे. या दरम्यान सीएसटीहून ठाणे स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान सर्व लोकल संबंधित स्थानकांवर १५ मिमिटे उशिराने पोहचणार आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये सणासुदीच्या दिवसात अनेक मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केले होते. यामुळे गेल्या काही दिवसात मध्य रेल्वेच्या मार्गावर अनेक एक्स्प्रेसचे अनेक अपघात झाले. त्यामुळे दुरुस्तीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुढचे काही दिवस शनिवार-रविवारीही मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या मेगाब्लॉकमुळे सीएसटीहून सुटणाऱ्या दोन कल्याण, एक अंबरनाथ, एक टिटवाळा आणि एक ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसंच सीएसटीला जाणाऱ्याही लोकल रद्द केल्या जातील. शनिवारी दोन तासांचा मेगाब्लॉक असला तरी रविवारी पाच तासांचाच मेगाब्लॉक असेल, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment