मेंदूला बसवला पेसमेकर

pacemaker
मुंबई – हृदयाला पेसमेकर बसवला जातो आणि हे सर्वांना माहीत झाले आहे. परंतु मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये गेल्या ३० ऑक्टोबरला करण्यात आलेल्या एका दुर्मिळ मेंदू शस्त्रक्रियेत ब्रिटनमधल्या एका व्यक्तीच्या मेंदूला पेसमेकर बसवला आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया जगात प्रथमच करण्यात आली आहे. ती डॉ. परेश दोशी यांनी केली आहे. शस्त्रक्रिया केलेला रुग्ण जॉर्ज जॉन्स्टन हा लंडनचा राहणारा असून एका बँकेत अधिकारी आहे.

जॉर्ज जॉन्स्टनला बर्‍याच वर्षांपासून डोक्याच्या अर्ध्या भागात वेदना होत असे. त्याला १३ महिन्यांपासून सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. औषधे घेऊन तो थांबला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागेल असे लक्षात आले. ब्रिटनमध्ये प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा उतरवलेला असतो. त्यात अशा महागड्या शस्त्रक्रिया केल्या जातात, परंतु त्याचा या शस्त्रक्रियेसाठी नंबर लागण्यास सहा वर्षे लागणार होते.

त्याला खाजगी रुग्णालयात स्वखर्चाने शस्त्रक्रिया केली तरच ती तातडीने होणार होती. मात्र त्यासाठी २२ लाख रुपये खर्च होता. मुंबईत यापेक्षा स्वस्तात उपचार होतात हे त्याला कळल्यावरून तो मुंबईत आला आणि मुंबईत त्याच्यावरील शस्त्रक्रिया ११ लाख रुपयांत करण्यात आली. आता त्याच्या मानेच्या मागच्या बाजूने मेंदूपर्यंत दोन तारा घालण्यात आल्या आहेत आणि त्या तारांना एक छोटे साधन जोडलेले आहे. त्याचे डोके दुखायला लागले की, हा पेसमेकर चालू केला जाईल आणि त्याच्या मेंदूला अशा काही प्रेरणा मिळतील की त्यामुळे डोकेदुखी थांबेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment