दुस-या सामन्यात भारताची श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात

raydu
अहमदाबाद – गुरुवारी मालिकेतील दुस-या वनडेत सलामीवीर शिखर धवनचे (७९) अर्धशतक आणि युवा फलंदाज अंबाती रायडूच्या (नाबाद १२१) तडाखेबंद शतकाच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेला ६ गड्यांनी पराभूत केले. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत या विजयासह २-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने कर्णधार मॅथ्यूजच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या बळावर ८ बाद २७४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ४४.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात गाठले.

धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मागच्या सामन्यातील शतकवीर अजिंक्य रहाणे या वेळी केवळ ८ धावा काढून बाद झाला. यानंतर शिखर धवनने दुस-या विकेटसाठी अंबाती रायडूसोबत १२२ धावांची शतकी भागीदारी केली. धवन ७९ धावा काढून बाद झाला. त्याने ८० चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि १ षटकार मारला. कर्णधार कोहलीने ४९ धावा काढल्या. त्याने ४४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारले. रैनाने १४, तर जडेजाने नाबाद १ धाव काढली.

तत्पूर्वी, श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुशल परेराला शून्यावरच उमेश यादवने पायचीत केले. यानंतर तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी दुस-या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. दिलशान ३५ धावा काढून बाद झाला. दिलशानने ३० चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले. माजी कर्णधार महेला जयवर्धने ४ धावा काढून ऑफस्पिनर अश्विनचा बळी ठरला.

Leave a Comment