सेनेचा भाजपला नवा अल्टिमेटम, ७ तारखेला निर्णय घ्या !

yuti
मुंबई – शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार की नाही यावरून अजूनही पडदा कायम असून शिवसेना दोन वजनदार खात्यांसह १० मंत्रिपदावर ठाम आहे. आता शिवसेना नेत्यांनी भाजपला पुन्हा एकदा ७ तारखेपर्यंतचा नवा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्रिपदासह १० मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पाडला. पण बहुमतासाठी भाजपला १५ दिवसांची मुदत आहे. त्यामुळे अल्पमतात असलेले सरकार कुणाला सोबत घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. भाजपने आपला जुना मित्र शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. पण आम्हाला सत्तेत येण्याची घाई नाही असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. पण दुसरीकडे सत्तेत सहभागाबद्दल सेनेने मागणीचा तगादा लावला. सात किंवा आठ तारखेपर्यंत शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी करावा, नाहीतर शिवसेना नऊ तारखेला विरोधीपक्षनेता घोषित करू असा अल्टिमेटम सेनेने दिला होता.

शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदासह १० ते १२ मंत्रिपदांची मागणी आहे. मात्र भाजप त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या आठ मंत्रिपदे देण्यास तयार असून त्यापैकी ४ कॅबिनेट तर ४ राज्यमंत्रिपदे असतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप उपमुख्यमंत्रिपद द्यायला तयार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे. तर आज सेनेने आपली नवी भूमिका मांडली असून शिवसेनेला दोन वजनदार खाती हवी आहे. त्याचबरोबर १० मंत्रिपदांवर शिवसेना अजूनही ठाम आहे. मंत्रिपदांसोबतच शिवसेनेला महत्त्वाची महामंडळंसुद्धा हवी आहेत. ९ तारखेच्या बैठकीत शिवसेना याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे कळत असल्यामुळेच गटनेता द्यायचा की विरोधी पक्षनेता, हे आता 9 तारखेलाच ठरणार आहे.

Leave a Comment