डिटेक्टिव्ह

detective
बाबुराव अरनाळकर किंवा तत्सम लेखकांच्या गुप्तहेर कथा वाचून आपला असा समज झालेला असतो की, खाजगी गुप्तहेर किंवा डिटेक्टिव्ह म्हणजे खुनाचा शोध लावणारा कोणी तरी शूर माणूस किंवा प्रसंगी मारामारी करायची तयारी आली तरी न घाबरणारा बॉडी बिल्डर. डिटेक्टिव्ह सेवा करण्याकडे हे गुण असतील तर त्याला उपयोग होतही असेल, परंतु डिटेक्टिव्ह होण्यासाठी ही तयारी असावीच लागते असे काही नाही. त्याशिवाय सुद्धा खाजगी गुप्तहेर म्हणून काम करता येते, आपला व्यवसाय सुद्धा उत्तम उभारता येतो. त्यासाठी शरीर बळापेक्षा सुद्धा मानसिक बळाची, चातुर्याची, समयसूचकतेची त्याचबरोबर लोकांशी उत्तम संपर्क साधण्याची कला अवगत असली पाहिजे. हे गुण अंगी असल्यास आपण हा बिनभांडवली उद्योग उभा करू शकतो. वैयक्तिक स्वरूपात आपण हा व्यवसाय करू शकतोच, परंतु डिटेक्टिव्ह फर्म सुद्धा उभी करता येते आणि काही सोबत्यांना सोबत घेऊन या बिनभांडवली उद्योगातून चांगली कमाई करता येते. खाजगी डिटेक्टिव्ह नावाची ही यंत्रणा इंग्लंड, अमेरिकेसारख्या मोठ्या देशातच उपयोगाची असते, भारतासारख्या देशात त्यांची काही गरज नाही अशी आपली कल्पना होऊ शकते. पण आपल्याही जीवनामध्ये ही व्यवस्था आता आवश्यक ठरायला लागली आहे.

अनेक वधूपिते आपल्या मुलींसाठी चांगला नवरा शोधायला लागतात. असा एखादा होतकरू जावई आपल्या नात्यातल्या किंवा परिचयाचा असला तर त्याची तपशीलात माहिती आपल्याला असते. त्याची आई कोण? वडील कोण? खानदान काय हे आपल्याला ठाऊकच असते. त्याची फार चौकशी करण्याची गरज पडत नाही. पण काही वेळेला वधू-वर सूचक मंडळातून जीवनसाथी निवडले जातात आणि अशा मंडळातून मुलाची किंवा मुलीची माहिती फार त्रोटक स्वरूपात उपलब्ध असते. वधूवर सूचक मंडळाकडेही ती माहिती उपलब्ध नसते आणि ते मुला-मुलींची नावे देताना किंवा त्यांचे पत्ते देताना आपल्याकडे त्यापेक्षा तपशीलात माहिती नसल्याचे निक्षून सांगत असतात. लग्न जमविण्याची घाई असणारे वधूपिते किंवा वरपिते जुजबी माहिती गोळा करून लग्ने उरकून टाकतात आणि नंतर काही दिवसांनी मुलाविषयी किंवा मुलीविषयीची अशी धक्कादायक माहिती हाती येते की, त्या माहितीमुळे आपली निवड चुकली आहे हे लक्षात येते. पण वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे कपाळाला हात लावण्याशिवाय हाती काही उरत नाही. असे प्रकार परदेशात नोकर्‍या करणार्‍या मुलांच्या बाबतीत घडल्याचे अनेकदा आढळले आहे.

पंजाबमध्ये तर अशा फसवल्या गेलेल्या हजारो मुली आहेत. एखादा होतकरू मुलगा मुलीला बघायला येतो. त्याने आपल्या बायोडाटामध्ये दरमहा एक लाख रुपये पगार मिळाला असल्याचे लिहिलेले असते. त्याच्या शब्दावर विश्‍वास ठेवून, ते खरे मानून मुलीचे वडील पुढे चर्चा सुरू करतात. पण त्याचा पगार खरोखर एक लाख असतो का? हे पडताळून कसे बघणार असा प्रश्‍न असतो. बघायला आलेल्या मुलाला तुझी पे स्लीप दाखव असे तर म्हणता येत नाही, मात्र एखाद्या डिटेक्टिव्हवर ही जबाबदारी सोपवून त्याच्या वेतनाची खातरजमा करून घेता येते. तो डिटेक्टिव्ह त्याच्या पद्धतीने ती माहिती काढून घेतो आणि ही चौकशी कुणासाठी आणि कशासाठी चालली आहे याचा कोणाला पत्ता लागत नाही. अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये अशा डिटेक्टिव्ह सेवेची गरज असते. मुंबई-पुण्यामध्ये मोठ्या संख्येने असे लोक कामालाही लागले आहेत आणि त्यातून त्यांना चांगली प्राप्तीही व्हायला लागली आहे. व्यापार किंवा उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आपले स्पर्धक काय करतात यावर आपले धोरण आखलेले असते. त्यामुळे अनेक उद्योजकांना आणि व्यावसायिकांना आपल्या स्पर्धकाच्या कामाची आणि व्यवहाराची बितंबातमी हवी असते. हे काम असे खाजगी गुप्तहेर करत असतात.

या कामामध्ये गोपनीयता पाळणे आणि कोणतीही माहिती काढताना माहितीच्या मूळ स्रोतापर्यंत जाऊन पोचणे आवश्यक असते. या दोन गोष्टी ज्याला येतील तो हा व्यवसाय चांगला करू शकतो. पण तो करण्यासाठी लोकांचे मानसशास्त्र ओळखण्याची कसब अंगी असावे लागते. लोकांच्या मनाचा विचार करून त्यांच्याकडून युक्तीने माहिती काढून घेता आली पाहिजे. त्याशिवाय आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्याशी इमान राखणे आणि पूर्ण विश्‍वासार्हता कमावणे हे जरुरीचे असते. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये हा व्यवसाय चांगला चालू शकतो. या व्यवसायाचा गुन्हेगारीशी संबंध येऊ शकतो. आपण माहिती काढत असताना आपल्यावर दडपण येऊ शकते. पण त्या दडपणाला न जुमानता व्यावसायिक निष्ठेने काम केले पाहिजे. हे काम करतानाच प्रगत तंत्रज्ञानाचाही वापर केला जात असतो. आपल्यावर सोपवले जाणारे काम कधी आर्थिक असेल, कधी सामाजिक असेल, कधी ते गुंतागुंतीचे तांत्रिक कामही असेल. मात्र त्या त्या कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक ती माहिती, ज्ञान आणि तंत्र माहीत करून घेऊन त्या विषयाला भिडावे लागते. ते सगळे शक्य झाले तर एक उत्तम बिनभांडवली उद्योग उभा राहू शकतो. आपण करत असलेल्या कामातून जी माहिती उपलब्ध होते ती अनमोल असू शकते. जिच्यामुळे एखाद्या उद्योजकाचा करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो. एखाद्याचे जीवन सुसह्य होऊ शकते. त्यामुळे आपल्यावर काम सोपविणारा माणूस काम यशस्वी झाल्यास कामाचे पैसे देण्याच्या बाबतीत हात आखडता घेत नाही. म्हणजेच प्राप्ती उत्तम होऊ शकते.