दुबई – वेस्ट इंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडल्यामुळे निर्माण झालेली वादग्रस्त परिस्थिती, तसेच सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले गोलंदाजी ऍक्शनचे प्रकरण हे दोन प्रमुख विषय आयसीसीच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीतील मुख्य चर्चेत राहणार असून चालू वर्षाची आयसीसीच्या कार्यकारिणीची ही शेवटची बैठक येत्या ९ व १० नोव्हेंबरला येथे होणार आहे.
आयसीसीत होणार वेस्ट इंडीजप्रकरणाची चर्चा
या बैठकीच्या वेळी आयसीसीच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीसह इतरही समित्यांच्या बैठका होणार आहेत. एन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीत भविष्यातील दौरा कार्यक्रम (एफटीपी), विश्वचषक २०१५ साठी खेळाचे नियम आणि संशयास्पद ठरत असलेल्या गैरकायदेशीर गोलंदाजी ऍक्शन आदी विषयांवर विचारविमर्ष केला जाणार आहे.
आयसीसीशी संलग्नित सर्व दहा पूर्ण सदस्य असलेल्या देशांचे प्रतिनिधी आणि सहयोगी देशांचे निवडण्यात आलेले तीन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.