आत्महत्या रोखता येतील

sucied
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निवडले गेले आहेत आणि ते विदर्भातील आहेत. गेल्या १५-२० वर्षांपासून विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा ज्वलंत विषय होऊन बसलेला आहे. परंतु १५ वर्षे महाराष्ट्राची सत्ता हाती असलेल्या राज्यकर्त्यांना हा प्रश्‍न सोडवता आला नाही. १५ वर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या अव्याहत होत राहिल्या. आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबतीत मोठी अपेक्षा आहे. ते जर या आत्महत्या रोखू शकले नाहीत तर त्यांची मुख्यमंत्री होणे व्यर्थ ठरणार आहे. सुदैवाची गोष्ट अशी की, या आत्महत्या रोखणे फार अवघड नाही. काही गोष्टी निश्‍चयाने केल्या आणि त्या दिशेने ताबडतोबीने पावले टाकली तर येत्या तीन-चार वर्षात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण नही के बराबर होऊन जाईल. गेल्या १५ वर्षात या दृष्टीने योग्य दिशेने प्रयत्न झाले नाहीत आणि अर्थात त्यामुळेच आत्महत्यांचे प्रमाण वाढत गेले. नाही म्हणायला या सरकारने काही आयोग, काही समित्या आणि एक अभ्यासगट नेमला. या सार्‍यांनी आपापल्यापरीने अभ्यास केला. पण त्यांना सुद्धा योग्य उपाय सापडला नाही.

शेतीला हमखास हक्काचे पाणी मिळाले तर शेती सुखाची होते. शेती व्यवसायातली अनिश्‍चितता त्यामुळे संपुष्टात येते ही गोष्ट खरी आहे. म्हणून या अभ्यासगटांनी आणि समित्यांनी विदर्भातील पाटबंधार्‍यांच्या सोयींवर लक्ष केंद्रित केले आणि पाटबंधार्‍यांच्या सोयी वाढवल्या की, आत्महत्या कमी होतील असा निष्कर्ष काढला. पाटबंधार्‍याच्या सोयी उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढते आणि उत्पन्नातली अनिश्‍चितता कमी होते हे खरे असले तरी पाटबंधार्‍याच्या सोयी वाढवणे हा आत्महत्यांवरचा उपाय नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण पंजाबमध्ये ९५ टक्के शेती बागायती असूनही तिथे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा बागायती शेती हा आत्महत्यांवरचा उपाय नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. आत्महत्या कमी करण्या साठीचा खरा प्रयोग सध्या चौफेर शेती प्रकल्पाच्या उपक्रमातून सुरू झालेला आहे. त्याचे तपशील पाहिल्यानंतर बर्‍याच उशिराने का होईना पण एक योग्य उपक्रम सुरू झाला असे वाटते. अहमदनगर येथील कृषी अभ्यासक प्रा. सुभाष नलांगे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. शेतीचे तंत्रज्ञान, विपणन, फळबागायती इत्यादी माध्यमांतून हा उपक्रम राबवला जात आहे. अरविंद कृषी विद्यापीठाचे कुलपती डॉ. मुकुंदराव गायकवाड यांचे मार्गदर्शन या प्रयोगाला लाभत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रयोगात रस घेतलेला आहे.

माझ्या मते शेती व्यवसाय यशस्वी होण्यासाठी पाच गोष्टींची गरज आहे. १) सेंद्रीय शेती २) जलसंधारण ३) फळबागायती ४) जोडधंदे आणि ५) काढणी पश्‍चात तंत्रज्ञान अर्थात प्रक्रिया उद्योग. चौफेर शेती प्रकल्पामध्ये या गोष्टींवर भर दिला जात आहे. विशेषत: फळ पिकांवर त्यांचा भर आहे आणि तो योग्य आहे. परंतु यातल्या काही गोष्टी लांब पल्ल्याच्या, मोठ्या भांडवली गुंतवणुकीच्या आणि अगदीच अशिक्षित असलेल्या शेतकर्‍यांना पटकन कळणार नाहीत अशा तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. विदर्भातली सध्याची परिस्थिती विचारात घेता तातडीने अमलात आणावयाच्या दोन गोष्टी मला सोप्या आणि व्यवहार्य वाटतात. शिवाय त्यांचे परिणाम चटकन जाणवणारे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे युनीक्रॉप सिस्टिमला फाटा देणे. म्हणजे एकच एक पीक घेण्याचे नियोजन बदलणे. आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि पंजाब या दोन राज्यात ही गोष्ट सामान्य आहे. विदर्भातले शेतकरी केवळ कापसाचे पीक घेतात आणि पंजाबचे शेतकरी केवळ गव्हाचे पीक घेतात. त्यामुळे हवामान प्रतिकूल होऊन एक पीक गेले की, शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडत नाही.

विदर्भाचे अनुकरण करून मराठवाड्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये असेच कापसाचे सिंगल पीक घेतले जाते त्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातले शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे लोण पसरत चालले आहे. तेव्हा एकच एक पीक घेणे हे आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. म्हणून शेतकर्‍यांना पुन्हा एकदा मिश्र पीक पद्धतीकडे वळवणे आवश्यक ठरणार आहे. एकाच हंगामात एकाच शेतात तीन किंवा चार पिके मिश्र पीक पद्धतीने घेतली पाहिजेत. हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे ती चारही पिके काही जाणार नाहीत. त्यातले एखाद-दुसरे पीक हाती लागतेच आणि निसर्गाचा फटका बसल्यामुळे शेतकरी पूर्णच उघड्यावर पडण्याची वेळ येत नाही. दुसरा उपाय आहे तो जोडधंद्याचा. जोडधंद्यामध्येही दुग्ध व्यवसाय हा थोडा अवघड आहे आणि भांडवल गुंतणारा आहे. पण एकदम छोट्या शेतकर्‍यांना शेळी पालन हा व्यवसाय फार हातभार लावणारा आहे. एखाद्या शेतकर्‍याकडे एक किंवा दोन शेळ्या असल्या तरी त्याची कौटुंबिक अर्थव्यवस्था ताळ्यावर राहते. शेळी ही गरिबांची गायच असते. ती वर्षातून दोन वेळा पिलांना जन्म देते. काही काही शेळ्या एकावेळी दोन किंवा तीन पिली देतात. त्यांच्यासाठी चार्‍यावर खर्च करावा लागत नाही. शेतकर्‍यांना अडीनडीला सावकाराचे ताेंड बघावे लागते, पण ज्या शेतकर्‍याकडे दोन किंवा तीन शेळया असतात त्यांना सावकाराच्या उंबरठ्याशी जावे लागत नाही. शेळ्या ही त्याच्या घरची बँकच असते. पश्‍चिम महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत, पण विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतात कारण विदर्भातल्या शेतकर्‍यांना जोडधंदे उपलब्ध नाहीत आणि पश्‍चिम महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना जोडधंदे उपलब्ध आहेत. तेव्हा मिश्र पीक पद्धती आणि शेळीपालन हे दोन उपाय आत्महत्यांच्या संख्येवर ताबडतोबीने नियंत्रण आणणारे ठरतील असा विश्‍वास वाटतो.

Leave a Comment