नारायण राणे यांना विनोद तावडेंच्या कानपिचक्या

vinod
मुंबई – नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर भाजपनेही त्याला उत्तर दिले आहे. फडणवीसांकडे अनुभव नाही असे म्हणणाऱ्या राणेंकडे मुख्यमंत्री झाल्यावर कोणता अनुभव होता, बेस्ट कमिटीचा? असा प्रतिसवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे, मात्र त्यांच्यात चातुर्य आणि सरकार चालवण्याचा अनुभव नाही, अशी टीका नारायण राणे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली होती.

नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्याकडे कोणता अनुभव होता, बेस्ट कमिटीचा?, असा सवाल तावडे यांनी केला. देवेंद्र फडणवीस १५ वर्ष विरोधी पक्षात बसून सरकारचे घोटाळे बाहेर काढत होते. मात्र आता ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना अनुभव नाही, काम करता येणार नाही, असे म्हणणे आश्चर्याचे आहे. तुम्हाला करता आले तर आम्हाला नक्की येईल, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

तर दुसरीकडे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही नारायण राणेंना उत्तर दिले आहे. सरकार चालवण्यासाठी आवश्यक गुण आमच्यात नसतील तर आम्ही ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करु. पण १५ वर्ष या सरकारच्या मंत्र्यांमध्ये जे दुर्गुण होते, ते काढण्याची व्यवस्था कोणामध्येही नव्हती. मला वाटते की त्यांना आरोप करण्याचा अधिकार राहिलेला नाही. ते दर १५ दिवसांनी एक नवा आरोप करत राहतील.

Leave a Comment