रुग्णसेवा

care
कोणताही नवा उद्योग हा समाजाच्या गरजातून निर्माण होत असतो आणि समाजाच्या गरजा ह्या बदलत्या परिस्थितीतून निर्माण होत असतात. सध्या एकत्र कुटुंब पध्दती लयाला गेली आहे आणि विभक्त कुटुंबे कशीबशी जगत आहेत. एकत्र कुटुंब पध्दती संपली म्हणून दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. कारण बदलत्या काळात ती योग्य नाहीच. पण विभक्त कुटुंबामुळे काही अडचणी ि निर्माण होत आहेत. एकत्र कुटुंबातला एखादा सदस्य आजारी पडला तर त्याचा कुणालाच भार वाटत नसे. त्याची सेवा करायला किंवा त्याच्याजवळ बसायला, त्याला दवाखान्यात न्यायला आणायला आणि त्याची औषधे आणायला घरात कोणीतरी रिकामा माणूस असेच. त्यामुळे एकत्र कुटुंबातील वृध्दांना निराधार वाटत नसे. पण आता घरात आईवडील, एखादा मुलगा, त्याची पत्नी आणि एक दोन लहान मुले एवढेच लोक राहिले आहेत. काही कुटुंबात तर फक्त आईवडीलच असतात. मुलगाही सोबत नसतो. काही वृध्दांची मुले गावातच वेगळी राहतात, काहींची मुले मोठ्या शहरात नोकर्‍याला जातात. आईवडिलांना मोठ्या शहरात करमत नाही म्हणून ते आपल्या गावी राहतात. काही आईवडील शेतीकडे बघायला म्हणून गावी राहतात. तर काही वृध्द दांपत्यांची मुले परदेशी गेलेली असतात. असे वृध्द लोक आजारी पडतात तेव्हा त्यांच्याजवळ बसायला घरातले कोणीही नसते. अशा लोकांना दवाखान्यात दाखल केले असेल तर फारच हाल होतात. कारण दवाखान्यात दाखल केलेल्या माणसासाठी दोघांची गरज असते. पण ती गरज विभक्त कुटुंब पध्दतीमुळे भागत नाही. परिणामी त्यातून सेवा उद्योगच उदयास आला आहे.

मोठ्या शहरात तर अशा रुग्णसेवा देणार्‍या लोकांची फारच गरज आहे. कारण लहान शहरात आणि खेड्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. कोणी आजारी पडल्यास शेजारचे लोक मदत करतात. विचारपूस करतात. वेळ पडल्यास दवाखान्यात घेऊन जातात. पण मोठ्या शहरात फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्या शेजारी कोण राहत आहे. याचाही लोकांना पत्ता नसतो. मग आजारपणात मदत करणे तर दूरच यातूनच रुग्णसेवा हा व्यवसाय उदयास आला आहे. ज्यांना कोणीही वैद्यकीय मदत करू शकत नाही अशा लोकांना रुग्णसेवा बहाल करणे आणि त्यापोटी काही ठराविक शुल्क घेणे असा हा व्यवसाय आहे. कदाचित लहान गावातील लोकांना असा काही व्यवसाय आहे याची माहितीही नसेल आणि असा व्यवसाय असू शकतो हेही त्यांना माहीत नसेल. आज मोठ्या शहरातून हा व्यवसाय सर्रास केला जात आहे.

रुग्णांच्या जवळ बसणे, त्यांची जमेल ती सेवा करणे अशा या व्यवसायाचे महत्त्व ओळखून लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टि्ट्यूट या संस्थेने या सेवेचा एक प्रशिक्षण कार्यक्रमसुध्दा ठेवलेला आहे. त्यात रुग्णसेवेशी संबंधित कामाचे प्रशिक्षण दिले जाते. खरे म्हणजे आपल्या घरात कोणी आजारी पडल्यास आपल्याला रुग्णसेवा किती व्यापक असते हे लक्षात येईल. रुग्णाचा डबा घरून आणणे, रिकामा डबा घरी नेणे, त्यांची औषधे आणून देणे ही तर कामे आहेतच पण रुग्णांची गरज ओळखून त्यांना रक्त उपलब्ध करून देणे. ब्लड बँकेतून रक्त मिळत असल्यास तेथून ते आणणे किंवा तसे उपलब्ध होत नसल्यास स्वयंसेवी संघटनांशी संपर्क साधून एखाद्या स्वेच्छा रक्तदात्याचे रक्त उपलब्ध करून देणे हीही कामे असतात. ज्या वृध्दांना मुले नाहीत, नातेवाईक नाहीत पण चांगले उपचार घेण्याची ऐपत आहे त्यांना तर या सेवेची फार गरज असते. काही रुग्णांना तर कोणत्या रुग्णालयात जावे याचा सल्ला देण्यापासून कामाची सुरूवात होते. उपचार सुरू असताना डॉक्टर रक्त, लघवी तपासून आणायला सांगतात. ती तपासून आणावी लागतात. त्यांचे रिपोर्ट मिळवून डॉक्टरांना दाखवावे लागतात. ही सगळी जबाबदारी पाहिली म्हणजे रुग्णसेवा हा किती व्यापक गरज असलेला व्यवसाय आहे हे लक्षात येते. विशेष म्हणजे या व्यवसायात आपली गुंतवणूक काही नाही. बिनभांडवली व्यवसाय आहे. हा एका बाजूने व्यवसायसुध्दा आहे आणि दुसर्‍या बाजूने सेवासुध्दा आहे. ज्यांना कोणी नाही त्यांची सेवा करणे हे पुण्यकर्मच आहे. त्यामुळे व्यवसायही होतो आणि सेवा केल्याचे समाधानही लाभते.

असे असले तरी या व्यवसायात पडणार्‍या तरुणाच्या मनात सेवा करण्याची प्रवृत्ती पाहिजे. लोकांविषयी सहानुभूती पाहिजे आणि पूर्णपणे मन लावून रुग्णांची सेवा बजावली पाहिजे. आपण ज्यांची सेवा करणार आहोत ते आपले कोणी लागत नाहीत. म्हणून तरी त्यांच्या सेवेबद्दल आपण त्यांच्याकडून पैसे घेत असतो. पण पैसे घेत असलो तरीही जणू काही ते आपले जवळचे नातेवाईक आहेत अशा भावनेने मनःपूर्वक सेवा केल्यास या व्यवसायातील कामे मिळणे अवघड जात नाही. हा व्यवसाय करण्यासाठी फार जाहिरातही करावी लागत नाही. मोठ्या रुग्णालयांमध्ये आपण अशी सेवा बजावत असतो याची कल्पना देऊन ठेवली आणि त्यांच्याकडे आपला संपर्काचा फोन नंबर दिला की पुरते. एखादा गरजू रुग्ण दाखल झाला की त्या रुग्णालयातील कर्मचारीच आपल्याला संपर्क साधून त्या रुग्णाशी आपल्याला जोडून देतील.

Leave a Comment