सध्याचे सरकार अतिशय कमजोर – नारायण राणे

rane
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी टोलमुक्तीची घोषणा केली, मात्र निवडणुकांनंतर त्यांनी यू टर्न घेतला आहे. फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे, मात्र त्यांच्यात चातुर्य आणि सरकार चालवण्याचा अनुभव नाही. राज्यातील सध्याचे सरकार अतिशय कमजोर असून, ते काहीही करु शकणार नाही, असा घणाघात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला. मुंबईत आज राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिवेसेनेवर हल्लाबोल केला.

राणे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस हे चांगल्या प्रतिमेचे व्यक्ती आहेत. मात्र त्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता नसल्याचा आरोप राणेंनी केला.

निवडणुकीपूर्वी भाजपने ज्या घोषणा केल्या आहेत, त्या पूर्ण करण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही. मुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये कोणीही अनुभवी नेते नाहीत.काय करायचे हेच त्यांना माहित नाही. प्रशासन हाताळायचे स्कील, अनुभव आणि चांगले सहकारी या सरकारमध्ये नाहीत. त्यामुळे हे सरकार जनतेच्या अपेक्षा भंगच करणार असा दावा, राणेंनी केला.

राज्यातील सध्याच्या भाजप सरकारमध्ये एकमेव एकनाथ खडसे हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्याशिवाय एकाही मंत्र्याला अनुभव नाही, असे म्हणत राणेंनी खडसेंची स्तुती केली. याशिवाय खडसेंनी बहुजन मुख्यमंत्र्यांबाबत जे वक्तव्य केले, हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे राणे म्हणाले.

अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र तोडायची भाषा करू नये. ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, फक्त विदर्भाचे नाहीत. त्यामुळे सध्यातरी त्यांनी महाराष्ट्र तोडून विदर्भ वेगळा कऱण्याची भाषा करू नये, असे राणेंनी ठणकावले.

शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहाता ते सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसते आहे. शिवसेना इतकी लाचार होईल असे वाटले नव्हते. बाळासाहेब असते, तर त्यांनी सत्तेवर लाथ मारली असती. बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला, मात्र उद्धव ठाकरेंनी तो गुंडाळून ठेवला. त्यामुळे शिवसेनेने स्वाभिमानाची गोष्ट करू नये. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नाव धुळीस मिळवले, असा घणाघातही राणेंनी केला.

कोकणी जनतेने मला जय आणि पराजय दोन्हीचाही अनुभव दिला. कोकणात मी खूप कामे केली. मात्र जास्त कामे केली म्हणूनच पडलो की काय, असे आता वाटते आहे. तसेच काँग्रेसने मला प्रचारप्रमुखाची जबाबदारी दिली, मला पराभव मान्य आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

Leave a Comment