
पुणे – आज एकविरेच्या दर्शनाला ६३ आमदार आणले आहेत. पण भविष्यकाळात १८० आमदार दर्शनाला घेऊन येईन असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य आगामी काळात महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असेही संकेत उद्धव यांनी दिले आहेत.
पुढच्या वेळीस १८० आमदारांसह येईन दर्शनाला – उद्धव ठाकरे
आज १२ वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी व मुलगा आदित्यसह लोणावळ्याजवळ असलेल्या कार्ल्यात दाखल झाले. याचबरोबर विधानसभेत निवडून आलेले शिवसेनेचे सर्व ६३ आमदारही विशेष व्हॉल्वो बसने कार्ल्यात पोहचले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आई एकविरा देवी आमची कुलदैवत आहे. विधानसभा निवडणुकीतही एकविरा आईच्या कृपेने ६३ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह आशीर्वाद मागण्यासाठी व नवस फेडण्यासाठी आलो आहे. मागील २५ वर्षापासून जेव्हा जेव्हा शिवसेनेचे आमदार-खासदार निवडून आले त्या सर्वांनी एकविरा देवीचे दर्शन घेतलेले आहे.
यापूर्वी सकाळी सर्व आमदार शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला व मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन कार्ल्याला रवाना झाले.
