कॉंग्रेसच्या प्रचाराचे दहा कोटी चोरीला?

congress
मुंबई – विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाच्या प्रमुख कारणांमध्ये प्रचाराच्या ढिसाळ नियोजनाकडे बोट दाखविण्यात येत होते. याचेच ढळढळीत उदाहरण समोर आले असून, प्रचारासाठी पक्षाकडून आलेल्या निधीपैकी दहा कोटी रुपयांचा निधी चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाची पोलिस नोंद झाली नसून, काँग्रेस नेत्यांनीही सोयीस्कर मौन बाळगले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढली. निवडणुकीत दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच प्रभादेवीच्या एका फ्लॅटमधून १० कोटी रुपयांची रक्कम चोरी गेल्याचे उघडकीस आले आहे. दादर परिसरामध्ये काँग्रेसचे कार्यालय असून, तेथूनच जवळ असलेल्या प्रभादेवीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेण्यात आला होता. या फ्लॅटमध्ये प्रचाराचे साहित्य ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून उमेदवारांना प्रचाराच्या साहित्याचे वाटपही करण्यात येत होते. येथूनच ही रक्कम चोरीस गेली आहे. ही बाब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नजरेसमोर आणून देण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. याविषयी विचारणा केली असता, पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर माणिकराव ठाकरे यांनी अशा प्रकारच्या चोरीचा इन्कार केला. एका आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यानेही चोरीची चर्चा होत असल्याबद्दल दुजोरा दिला; मात्र, याविषयी ठोस पुरावा नसल्याचे सांगितले. तसेच, उमेदवारांना पक्षाचा निधी उपलब्ध करून न दिल्याबद्दल स्थानिक नेत्यांना दोषी धरले.

Leave a Comment