‘अजिंक्य’खेळीवर ‘शिखर’सर

cricket
कटक – विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंका संघाचा १६९ धावांनी पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताच्या विजयात सलामीचे शतकवीर अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी सिंहाचा वाटा उचलला. या जोडीने पहिल्या गड्यासाठी २३१ धावांची भागीदारी केली, तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा श्रीलंका फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला.

विजयासाठी ३६४ धावांचा पल्ला गाठणे श्रीलंका संघासमोर एक यक्ष आव्हानच होते. थरांगा व दिलशान ही अनुभवी जोडी खेळपट्टीवर उतरली. वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे चेंडू खेळणे सलामीच्या जोडीला अवघड ठरत होते. त्याचाच फायदा घेत उमेशच्या एका चेंडूने दिलशानच्या बॅटला स्पर्श केला व तो चेंडू थेट यष्टिरक्षक वृध्दिमान साहा याच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावला. त्यावेळी ८.५ षटकात १ बाद ३१ धावा झाल्या होत्या.

बर्‍याच विश्रांतीनंतर ईशांत शर्मा याची गोलंदाजी बहरली. त्याने संगकारा, प्रियंजन, रणदिव व प्रसाद यांना बाद करून श्रीलंका गोटात खळबळ उडवून दिली. श्रीलंका संघाकडून सर्वाधिक ४३ धावा जयवर्धने याने काढल्या. ३९.२ षटकात त्यांचा डाव १९४ धावात गारद झाला व १६९ धावांनी पहिला सामना गमावला.

Leave a Comment