रुग्णालयातील कर्मचा-यांनाच डेंग्यू

kem
मुंबई – मुंबईतील निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच रुग्णालयातील ९ कर्मचा-यांना डेंग्यू झाल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. पुरेशी औषधे या कर्मचा-यांवर उपचारासाठी नसल्याने नाराजीचे वातावरण असून औषधे वेळवर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सध्या कर्मचा-यांसह १३ रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत असून यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान कीटकनाशक विभागाकडून रुग्णालयाची तपासणी झाली असता रुग्णालय परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या.

रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. त्यामुळे येथे पाण्याचा साठा मोठय़ा प्रमाणात होत असून त्याचा योग्यवेळी निचरा होत नसल्याने रुग्णालयातील कर्मचा-यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे.

दरम्यान, कर्मचा-यांचा असंतोष पाहून रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी औषधाचा पुरवठा डेंग्यूग्रस्त कर्मचा-यांना लवकर सुरू होईल, असे आश्वासन दिल्याचे समजते. दरम्यान, औषधांचा पुरवठा न झाल्यास सोमवारपासून कर्मचा-यांकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कर्मचा-यांकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment