मध्यवर्ती कारागृहात आढळले ४० मोबाईल

jail
मुंबई – मुंबईच्या आर्थर रोड परिसरातील मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांजवळ ४० मोबाईल फोन आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने पोलिस प्रशासन हादरून गेले असून या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर या प्रकारामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

या कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यांप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. त्याचप्रमाणे अनेक कुख्यात गुंडांना येथील विशेष सुरक्षा असलेल्या अंडा सेलमध्ये ठेवले जाते, त्या सेलमधूनही मोबाईल सापडले आहेत. या कारागृहात नेमके काय शिजत आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ न शकल्याने आर्थर रोड कारागृहातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

आर्थर रोड कारागृह हे मुंबईतील एक मोठे कारागृह आहे. दाऊद इब्राहिम टोळी, छोटा राजन टोळी, गवळी टोळी तसेच वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांतील आरोपी या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मोठ्या गुन्हेगारांना अंडा सेलमध्ये ठेवले जाते. अंडा सेल हा कारागृहातील सर्वात सुरक्षित भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, याच अंडा सेलमध्ये तसेच इतरत्र मोबाईल सापडले आहेत. कारागृह प्रशासनाने ते ताब्यात घेतले आहेत. एकूण आर्थर रोड कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांची मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Leave a Comment