मुंबई – मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राज्यातल्या पहिल्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळ्यास पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सवरा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. या सात कॅबिनेट मंत्र्यांनंतर दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गोपनीयतेची शपथ
या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. याच बरोबर शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणा-या शिवसेनेने अखेर सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. खुद्द अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांना फोनवरुन सोहळ्यास उपस्थित राहण्याची सूचना केल्यामुळे ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहिले.