लाचलुचपत विभागाच्या गळाला लागले मंत्रालयातील लाचखोर अधिकारी

curancy
मुंबई – महसूल विभागातील कक्ष अधिका-यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जमिनीच्या हक्काबाबत फिर्यादीच्या बाजूने लागलेल्या आदेशाची प्रत देण्यासाठी २३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणी अटक झालेल्यांमध्ये संजय सुराडकर(४५), वैभव आंधळे(२३) व देवीदास दहिफळे यांचा समावेश असून सुराडकर हे मंत्रालयातील महसूल विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील १८ एकर जमिनीची पॉवर ऑफ एटर्नी असून या जमिनीचे हक्क फिर्यादी यांना मिळण्यासाठी महसूल राज्यमंत्र्यांकडे सुनावणीही झाली. त्यात फिर्यादीच्या बाजूनेही आदेश देण्यात आला होता. मात्र, या आदेशाची प्रत मिळण्यासाठी मध्यस्थी असलेल्या वैभव आंधळेने २५ लाख रुपयांची मागणी केली. परंतु, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे फिर्यादीने याप्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानुसार कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ लाचलुचपत विभागाने सापळा रचला.

त्यात फिर्यादी यांच्याकडून लाचेची २३ लाख रुपयांची रक्कम वैभव आंधळे याने स्वीकारली व त्यातील एक लाख सुराडकर, तसेच ५० हजार रुपये दहिफळे या खासगी व्यक्तीला दिल्यानंतर लाचलुचपत विभागाने या तिघांनाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची संपूर्ण २३ लाखाची रक्कम हस्तगत करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Leave a Comment