महापालिकेची हॉस्पिटलला स्वच्छतेची नोटीस

kem
मुंबई – केईएम हॉस्पिटलमधील भूलशास्त्र विभागातील डॉ. श्रृती खोब्रागडे यांचा डेंग्यूने मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर पालिका प्रशासन हादरले असून केईएम हॉस्पिटलच्या परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आढळून आल्यानंतर महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने केईएम हॉस्पिटलला नोटीस पाठवून संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यास सांगितले आहे. कीटकनाशक विभागाने गेल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, तेव्हा हॉस्पिटलच्या आवारातील भंगार सामान, डॉक्टरांची निवासस्थाने, पाण्याच्या पाइपच्या आजुबाजूला साचलेल्या पाण्यात, बकेटमध्ये काही ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. त्यानंतर कीटकनाशक विभागाने हॉस्पिटल परिसरात धूर फवारणी केली. त्यानंतर आता पालिकेने हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे. डासांच्या अळ्यांची पैदास रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास हॉस्पिटलला सांगण्यात आल्याचे किटकनाशक विभागाचे प्रमुख डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

Leave a Comment